Headlines

नांदिनच्या वाडीपिसोळ परिसरातील मातीचा बंधारा दोनच महिन्यात फुटला:काम करताना दगडांची रचना, माती व मजबुतीवरही प्रश्नचिन्ह‎


.

बागलाण तालुक्यातील नांदिन येथील वाडीपिसोळ किल्ला परिसरात उभारण्यात आलेला माती बंधारा दोन महिन्यातच फुटला आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बंधाऱ्यासाठी वापरलेली माती, दगडांची रचना व मजबुतीची तांत्रिक तपासणी करून कामासाठी मंजूर निधीचा योग्य वापर झाला का, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कामादरम्यान शेतरस्त्याचे नुकसान झाल्याचा आरोप करत दुरुस्ती व नुकसानभरपाईचीही मागणी करण्यात आली आहे. नांदिन परिसरातील माती बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कामाच्या पद्धतीबाबत शंका निर्माण झाल्याचे नेरकर यांनी म्हटले आहे. बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेली माती, दगडांची रचना आणि बांधकामाची मजबुती यांची संबंधित विभागाने तांत्रिक पथकामार्फत तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.माती बंधाऱ्याचे काम सुरू असताना शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याचे नुकसानझाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणी येत आहेत. नुकसानग्रस्त रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी तसेच संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नेरकर यांनी केली. बंधाऱ्यासाठी मंजूर निधी, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष खर्च, कामाचे मोजमाप आणि वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नेरकर यांनी केली आहे. काम कागदोपत्री पूर्ण न दाखवता प्रत्यक्ष ठिकाणी त्याची गुणवत्ता तपासावी, असेही त्यांनी म्हटले आहे. माती बंधाऱ्याच्या कामाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची भूमिका तपासावी. अनियमितता किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नेरकर यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कामात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करून प्रत्यक्ष स्थिती झाकली जाऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. नांदिन परिसरात वनविभागाच्या माध्यमातून यापूर्वी करण्यात आलेल्या इतर कामांचीही गुणवत्ता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या निधीतून होणारी कामे दर्जेदार व टिकाऊ राहण्यासाठी संबंधित विभागाने प्रभावी देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नेरकर यांनी व्यक्त केली.

संबंधित माती बंधाऱ्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होईल. कामात त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. – शेखर तनपुरे , विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *