Headlines

दारामध्ये गॅसची पाइपलाइन, तरी 65 दिवसांपासून मीटरची प्रतीक्षा:नागापूर एमआयडीसीतील 5,600 कामगारांच्या रोजगार अडचणीत‎




बंडू पवार | अहिल्यानगर नागापूर औद्योगिक वसाहतीतील ४५ उद्योगांनी कोट्यवधी रुपये खर्च करून पाइपलाइन गॅसचे कनेक्शन घेतले; मात्र गॅस सुरू करण्यासाठी आवश्यक मीटरच उपलब्ध नसल्याने हे उद्योग मागील ६५ दिवसांपासून गॅसच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात केवळ एका उद्योगाला मीटर मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित उद्योगांना नाइलाजाने महागडे व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरावे लागत असून, त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. या उद्योगांवर सुमारे ५,६०० कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. विशाखापट्टणम येथून श्रीगोंदेमार्गे अहिल्यानगरमध्ये मुख्य गॅस पाइपलाइन आणण्यात आली आहे. केडगाव येथील मुख्य स्टेशनपासून नागापूर एमआयडीसीसाठी अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आली. उद्योगांनी त्यासाठी खर्च करून कनेक्शन घेतले; मात्र मीटरअभावी प्रत्यक्ष गॅसपुरवठाच सुरू झालेला नाही. उद्योगांना लागणारे विशेष गॅस मीटर अन्य देशांतून गुजरातमध्ये आयात होऊन तेथून देशातील विविध शहरांत वितरित केले जातात. सध्या या मीटरची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने उपलब्धता होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाइपलाइन असूनही उद्योगांना सिलिंडरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सिलिंडर संपल्यानंतर तो बदलावा लागतो किंवा नवीन येण्याची वाट पाहावी लागते. याउलट पाइपलाइन गॅस हा २४ तास नळासारखा थेट उपलब्ध राहतो, त्यामुळे उत्पादनात खंड पडत नाही. सिलिंडर उचलणे, गोदामात साठवणे, त्यांची नोंद ठेवणे आणि रिकामे सिलिंडर बदलण्याचे झंझट पूर्णपणे संपते. उद्योगांमध्ये सिलिंडर साठवण्यासाठी मोठी जागा राखून ठेवावी लागते. पाइपलाइनमुळे जागेचा प्रश्न सुटतो आणि फॅक्टरी परिसर अधिक सुरक्षित राहतो. शिवाय पाइपलाइनचा गॅस नैसर्गिक वायू किंवा सीएनजी, पीएनजी हा प्रदुषणमुक्त असतो. यामुळे कारखान्यांच्या परिसरात धूर किंवा काजळी साचत नाही. गॅस कंपनीने केवळ पाइपलाइन टाकून आपले ‘टार्गेट’ पूर्ण केल्याचे दाखवले आहे, पण प्रत्यक्षात गॅस पाइपलाइन टाकणाऱ्या कंपनीनेच गॅस मीटरबाबत टोलवाटोलवी चालवली आहे. हे गॅस मीटर गुजरात आणि आंध्रदेशातून येतात. मध्यतंरी युध्दामुळे कच्चा माल मिळत नसल्याने मीटर मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. आता युद्ध संपून महिना झाला, मात्र मीटर मिळेनात. जिल्हाधिकारी स्वत: मीटरसाठी कंपनीकडे विचारणा करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *