![]()
ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधले
.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ हंडी सोहळा श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराजांचा ७३१ वा समाधी सोहळ्यानिमित्त पार पडला. तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज व कुटुंबीय यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडली. या सोहळ्याला या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, माढा तहसीलदार संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य वंदना कांबळे, माजी सभापती शिवाजी कांबळे, माजी सभापती भारत शिंदे, संत सावतेबुवा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, अॅड. विजय शिंदे, सावता रणदिवे, सावता महाराजांचे वंशज भीमराव वसेकर, दादा महाराज वसेकर, रमेश महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, दामोदर वसेकर, अंकुश वसेकर आदींसह भाविक उपस्थित होते.
दही, भात, लाह्यांचा प्रसाद श्रीफळ हंडीचा सोहळ्याला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सोहळ्यासाठी लागणारे हंडीच्या कड्याचे व हंडी फिरवण्याचा मान गिड्ढे परिवाराचा असून त्यांच्या घरून डोक्यारून वाजत गाजत मंदिराकडे आणले जाते. तसेच हंडी ही श्री संत सावता महाराज मंदिरातून त्या हंडीत दही, भात व लाह्या हे सर्व भरून मंदिरातील पुजारी श्रीफळ हंडीच्या स्थळी आणतात. त्या नंतर त्यांनी आणलेले हंडीचे कडे व हंडी ही एकत्र बांधून मंदिर प्रांगणात पारावरती उभ्या असलेल्या लोखंडी खांबाला बांधली जाते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण श्रीक्षेत्र अरण येथील श्रीफळ हंडी सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अर्पण केले. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या श्रीफळ हंडी सोहळ्याला शुभेच्छा देत आपले श्रीफळ तोरण संत सावता महाराजांच्या चरणी आणि श्रीफळ हंडीला समर्पित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.