![]()
मुंबईतील ताडदेव परिसरातील एका फ्लॅटच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका ब्रोकरने “मांसाहार करणाऱ्यांना या सोसायटीत घर मिळणार नाही” असा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि मनसेने या प्रकारावर आक्षेप घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. नेमका प्रकार काय? व्हिडीओत काय म्हटलंय? सोशल मीडियावर स्वतःची ओळख ब्रोकर म्हणून सांगणाऱ्या भावेश कावरे यांनी इन्स्टाग्रामवर एका फ्लॅटच्या विक्रीची जाहिरात करणारी रील पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये तो ताडदेव परिसरातील एका इमारतीमधील २ बीएचके (९०० स्क्वेअर फूट) घराची माहिती देत आहे. मात्र, ही माहिती देताना त्याने घातलेली अट वादग्रस्त ठरत आहे. व्हिडीओमध्ये भावेश म्हणताय, “तुम्ही प्युअर शाकाहारी असाल, तरच कॉल करा. इथे ताडदेवमध्ये २ बीएचके घर उपलब्ध आहे, ज्याचा कार्पेट एरिया ९०० स्क्वेअर फूट आहे. पण जर तुम्ही मांसाहार करत असाल, तर तुम्हाला इथे घर मिळणार नाही. शाकाहारी असाल तर तुमचं नक्कीच स्वागत आहे.” ही अट उघडपणे सांगणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतापाची लाट व्यक्त केली आहे. किशोरी पेडणेकरांचा थेट इशारा या प्रकाराची दखल घेत राजकीय पक्षांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या भेदभावावर सडकून टीका केली. “हा ब्रोकर स्वतःच्या मनाने बोलत नसून तो थेट बिल्डरचीच भाषा बोलत आहे,” असा आरोप पेडणेकर यांनी केला. तसेच, “या ब्रोकरला शोधून काढून आम्ही त्याचा योग्य तो समाचार घेऊ,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाकरे गटासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, भावेश कावरे यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओ डिलिट केला आहे. याआधीही घडलेत असे प्रकार मुंबईत मराठी माणसाला किंवा मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना घर नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी घाटकोपर, मुलुंड आणि चांदिवली यांसारख्या भागांमध्ये अशाच प्रकारे घरे नाकारल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यावेळी विविध मराठी संघटनांनी अशा प्रकणाचा निषेध केला होता. आता पुन्हा एकदा थेट ताडदेवसारख्या मध्यवर्ती भागात असा प्रकार घडल्याने संबंधित ब्रोकर आणि बिल्डरवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंचा मोठा दणका:मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज पिझ्झाचे 5 परवाने निलंबित; गोंदियातील 4 आयुर्वेदिक कंपन्यांवरही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जात आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला असून, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘डॉमिनोज् पिझ्झा’च्या मुंबईसह राज्यभरातील 5 आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा..
Source link
मांसाहारी असाल तर घर मिळणार नाही!:मुंबईच्या ताडदेवमधील ब्रोकरचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गट आणि मनसे आक्रमक