![]()
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड (वय २३) यांनी मोशी परिसरातील संजय गांधी नगर झोपडपट्टीत राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री घडली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली गायकवाड आपल्या चार आणि दोन वर्षांच्या दोन मुलींसह संजय गांधी नगर येथे राहत होत्या. त्यांचे पती नागेश गायकवाड मोशी कचरा डेपोमध्ये मजूर म्हणून काम करत होते. डेपो परिसरातील एका इमारतीत अडकून त्यांचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सोनाली यांच्यावर आली होती. दोन वर्षांची मुलगी घरातील पाळण्यात झोपली होती १२ ऑगस्टच्या रात्री सोनाली यांची चार वर्षांची मुलगी काही वेळासाठी घराबाहेर गेली होती, तर दोन वर्षांची मुलगी घरातील पाळण्यात झोपली होती. याचदरम्यान, सोनाली यांनी स्वयंपाकघरात जाऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळाने चार वर्षांची मुलगी घरी परतली. तिने घराची कडी वाजवली, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारी राहणारे सोनाली यांचे काका, आजी-आजोबा आणि इतर स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडल्यानंतर सोनाली या स्वयंपाकघरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यावेळी त्यांची दोन वर्षांची मुलगी पाळण्यात झोपलेली होती. घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, सोनाली यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मोशी कचरा डेपो दुर्घटना: 84 तासांची बचावमोहीम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोध आणि बचावकार्य सलग ८४ तास चालले होते. या घटनेत एकूण ९ नागरिकांचा दुर्दैवी झाला होता. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तसेच या घटनेस जबाबदार धरून संबंधित ठेकेदार कंपनी आणि पर्यावरण विभागाला नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
Source link
मोशी कचरा डेपो दुर्घटना:पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, भोसरी एमआयडीसी पोलिसांत नोंद