![]()
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर, शिवसेनेा शिंदे गटाचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी ‘महायुती’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही मित्रपक्षांमधील धुसफूस आणि अंतर्गत वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाशी संबंधित वामन खोसकर यांच्या कथित शिवीगाळ आणि धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून दिव्य मराठी डिजिटल या क्लिपची पुष्टी करत नाही. रवींद्र भोये यांनी केलेल्या तक्रारीची आता पोलिसांकडून सविस्तर चौकशी केली जाईल आणि या पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती उघडकीस येणार आहे. आमदार आणि त्यांच्या पुत्राविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी रवींद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वामन खोसकर यांनी आपल्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची थेट धमकी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे भोये यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आमदारपुत्र बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना धमकावतात, भोये यांचा आरोप रवींद्र भोये यांनी पुढे आरोप करताना म्हटले की, प्रशासकीय अधिकार लोकप्रतिनिधींकडे असताना आमदारपुत्र स्वतः परस्पर बैठका घेऊन ग्रामसेवकांना धमकावत आहेत. तसेच मला मदत न करण्यासाठी सर्वांना वेठीस धरले जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असून त्याविरोधातील आपला आवाज दडपण्यासाठीच वामन खोसकर यांच्याकडून अशा धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि शिवसेना शिंदे गटाचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांच्यातील या वादामुळे, राज्यात सत्तेत असलेल्या ‘महायुती’तील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी रवींद्र भोये यांनी आमदार खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, आता नाशिक ग्रामीण पोलिस या तक्रारीची दखल घेऊन नेमकी काय भूमिका घेतात आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला थेट जीवे मारण्याची धमकी:रवींद्र भोयेंची पोलिसांत धाव; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल