![]()
छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजल्यापासूनच महात्मा फुले चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महात्मा फुले चौकातून क्रांती चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सव्वा चार वाजता आगमन झाले, त्यानंतर रॅलीला औपचारिक सुरुवात झाली. गेल्या दोन तासांपासून महात्मा फुले चौकात जल्लोष सुरू होता. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीते आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. युवा वर्ग मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभागी झाला होता. हातात तिरंगा घेऊन डौलाने फडकवणारे, पांढऱ्या रंगाची टोपी आणि टी-शर्ट परिधान केलेले हजारो तरुण ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणा देत चौकाचौकांत दाखल होत होते. यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता. या रॅलीला अनेक राजकीय दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये विधान परिषद सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचा समावेश होता. मुख्य व्यासपीठाजवळ स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरली होती. उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिक हातात तिरंगा घेऊन उत्साहाने फडकावत होते. रॅलीदरम्यान तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि अनेक जण या ऐतिहासिक क्षणाचे ‘सेल्फी’ काढून छायाचित्रण करत होते. कडक उन्हात रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांकडून पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात येत होते. क्रांती चौकाकडे सरकणाऱ्या या रॅलीमुळे संपूर्ण मार्गावर जनसागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये CM देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली:महात्मा फुले चौकात दोन तासांपासून नागरिकांची मोठी गर्दी, जल्लोष