![]()
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने गेल्या साडेतीन वर्षांत बेकायदेशीर तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना कस्टम आयुक्तालयाने ही माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२३ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत कस्टम विभागाने सुमारे ९.८६ कोटी रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये तब्बल १५ किलो सोन्याचा समावेश आहे. कस्टम विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या कालावधीत तस्करीचे एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये ९.२४१ कोटी रुपये किमतीचे १४.९९६ किलो सोने, ४२.२ लाख रुपयांचे ४५ महागडे मोबाईल, १७.५ लाख रुपये किमतीचे ८ किलो केशर आणि ३.१ लाख रुपये मूल्याची ७ महागडी घड्याळे यांचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये कस्टम विभागाने एकूण ७ जणांना अटक केली होती, मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली. परदेशातून नागपूर विमानतळामार्गे होणाऱ्या बेकायदेशीर मौल्यवान वस्तूंच्या तस्करीवर कस्टम विभागाची करडी नजर असल्याचे या आरटीआय खुलाशावरून स्पष्ट होते.
Source link
नागपूर विमानतळावर सव्वा नऊ कोटींचे 15 किलो सोने जप्त:आरटीआयमधून कस्टम विभागाच्या मोठ्या कारवाईचा खुलासा