Headlines

निवेदन:कर्जमाफीच्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करा: आमदार चव्हाण




शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत पोर्टलवर उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केली. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन या संदर्भात एक सविस्तर निवेदन सादर केले आणि कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार चव्हाण यांनी शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या प्रशासनासमोर मांडल्या. फार्मर आयडी आणि ई-केवायसीमधील त्रुटी, शेती विक्रीमुळे सातबारावरील नोंदी बदललेले शेतकरी, तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे फार्मर आयडी व ई-केवायसी न होण्याबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच आधार अपडेट न होणे, फार्मर आयडी असूनही पोर्टलवर नॉट फाऊंड असा मेसेज येणे यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. पोर्टलवरील रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील तफावत दूर करणे, लाभार्थी यादीतील चुकीचे बँक खाते व मोबाईल क्रमांक दुरुस्त करण्याची सुविधा देणे, सामायिक जमिनी व वारसदार प्रकरणांमध्येही कर्जमाफीचा लाभ मिळवून देणे या मुद्द्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाचे वाटप लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली. सर्व अडचणींची दखल घेऊन, यावर लवकरात लवकर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *