![]()
आगामी काळात बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत. “बुलढाण्यात खूप मोठं ‘ऑपरेशन टायगर’ होणार असून, राज्यात शिवसेनेचा सर्वात मोठा बालेकिल्ला बुलढाणा होणार आहे,” असा दावा गायकवाड यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकवाड यांनी आगामी राजकीय वाटचालीचे संकेत देतानाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तुम्ही विश्वासही करणार नाही, इतके लोक शिवसेनेत येण्यास तयार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रवेश होणार असल्याचा दावा केला. “बुलढाणा जिल्ह्यात खूप मोठं ऑपरेशन टायगर होणार आहे. राज्यात शिवसेनेचा सर्वात मोठा बालेकिल्ला बुलढाणा होणार आहे. तुम्ही विश्वासही करणार नाही, इतके मोठे बुलढाण्यातील लोक शिवसेनेत येण्यासाठी तयार आहेत,” असे ते म्हणाले. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून नेमके कोणते नेते किंवा पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे खांद्यावर घेऊन चालवत आहेत शिवसेना नेमकी कोणाची, या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावरही गायकवाड यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फक्त एकनाथ शिंदे साहेब आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहेत,” असा दावा त्यांनी केला. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांची असल्याचे सांगितले जाते. मात्र या दाव्यावर गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. जनतेने शिक्कामोर्तब केल्यानंतर वाचाळपणा कशाला? शिवसेनेवरील दाव्याच्या मुद्द्यावर न्यायालयीन आणि संसदीय प्रक्रियेचाही संदर्भ गायकवाड यांनी दिला. “हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले, लोकसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आणि सर्वाधिक खासदार शिवसेनेचे आहेत. जनतेनेही शिक्कामोर्तब केल्यानंतर वाचाळपणा करण्याची गरज काय?” असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. “जो निर्णय जनतेचा, तोच निर्णय सुप्रीम कोर्टाचा राहणार आहे,” असेही गायकवाड म्हणाले. चिखलीत भगवा फडकवण्याचा निर्धार चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. चिखली मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र एखादा कार्यकर्ता शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला की त्याच्यावर पोलिसांमार्फत कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर याद राखा यावेळी संजय गायकवाड यांनी पोलिस अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. “कुणी माईचा लाल पैदा झाला नाही तुमच्यावर कारवाई करायला. मी सगळ्या ठाणेदारांना सांगितले आहे. आतापर्यंत आम्ही बोललो नाही; मात्र कुणाच्या सांगण्यावरून कारवाई केली तर याद राखा,” असे ते म्हणाले. “हे आमचं आग्या मोहोळ आहे. कुठे-कुठे डंक मारला तर मग सगळ्या बाजूने मागून-पुढून सुजून बसाल,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चिखली मतदारसंघातील आगामी राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. मी पळपुटा आमदार नाही दरम्यान, आपण इतर आमदारांसारखे दबावाखाली मागे हटणारे किंवा पळून जाणारे आमदार नसल्याचेही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले. “मी बाकीच्या आमदारांसारखा शेपूट घालून पळपुटा आमदार नाही,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपले इरादे बदलू नका, वेळ कधीही बदलू शकते, असा संदेश त्यांनी आपल्या शेरोशायरीतून दिला. हेही वाचा… रायगड हादरले:महाड MIDC मधील ‘इंडो अमायन्स’ कंपनीत वायूगळती; एका कामगाराचा मृत्यू, 8 जण जखमी रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत (MIDC) एक दुर्दैवी दुर्घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इंडो अमायन्स’ या रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी अचानक विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले असून, अन्य ८ जण गंभीररीत्या बाधित झाले आहेत. या घटनेमुळे महाड शहर आणि औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बुलढाण्यात मोठं ‘ऑपरेशन टायगर’ होणार:राज्यातील शिवसेनेचा सर्वात मोठा बालेकिल्ला बुलढाणा करणार – संजय गायकवाड