![]()
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर अमरावती येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर आधारित उत्कृष्ट कवायती सादर केल्या. त्यांच्या लक्षवेधक सादरीकरणाचे शिक्षणमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख आणि जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण आंधळे उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भावी सुजाण नागरिक आहेत. पालकांनी दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींमध्ये तडजोड केली तरी, पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड न करता त्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या शाळेत गुणात्मक शिक्षणासोबतच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि सैनिकी प्रशिक्षण दिले जात असल्याची बाब कौतुकास्पद आहे. शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबतच शाळेतील अन्य आवश्यक सुविधांसाठी शासनातर्फे पूर्ण मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ आणि ‘मेरा देश, मेरा मुल्क, मेरा ये वतन’ यांसारख्या देशभक्तीपर गीतांवर सुंदर कवायती सादर केल्या. विविध परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या श्रावणी सोनोने, जाणीव नंदेश्वर, अंतरा वाट, अनुष्का सूर्यवंशी या विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला. गजानन पवार, सुदाम वानखडे आणि श्रीराम मकेश्वर या माजी सैनिकांचा, तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला. वंदेमातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्हा परिषद कन्या शाळेला सुविधांसाठी शासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे सांगताना मंत्री भुसे यांनी प्रत्येक वर्गात गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थिनींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई-वडील, गुरुजन, कुटुंब, गाव, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
Source link
जिल्हा परिषद कन्या शाळेत देशभक्तीपर गीतांवर कवायती:शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक, सुविधांसाठी मदतीचे आश्वासन