Headlines

अमरावतीत महारक्तदान शिबिरात 1298 रक्त पिशव्यांचे संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मद्यविक्रेत्यांचा अनोखा उपक्रम




अमरावती येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे पार पडला, ज्यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंतराव वानखडे, आमदार प्रवीण पोटे, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरादरम्यान अमरावती शहरातून १ हजार १८७ रक्त पिशव्या, तर धारणी तालुक्यातून १११ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. एकूण ९ प्रमुख रक्तपेढ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये अमरावती येथील इर्विन हॉस्पिटल, शासकीय रक्तपेढी, डॉ. गोडे मेडिकल कॉलेज, संत गाडगेबाबा रक्तपेढी, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अकोला येथील लेडी हार्डिंग हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जालना येथील जनकल्याण रक्तपेढी आणि यवतमाळ येथील एकनील रक्तपेढीचा समावेश होता. या शिबिराला महापालिकेचे विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक प्रदीप हिवसे, चंदू खेडकर, प्रा. संजय तिरथकर, यश खोडके, सुनील राणा आदींनी भेट दिली. मेजर आनंद, मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी, अधीक्षक प्रमोद सोनोने, शशिकांत गर्जे, सीमा झामरे, नितीन देशमुख आणि अनिल भामोरे यांनी रक्तदान केले. यावेळी आनंद भामोरे, राजूभैय्या जैस्वाल, हरीश आलमचंदानी, इस्माइल लालूवाले आणि सायकलिंग असोसिएशनचे डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी आतापर्यंत यवतमाळ, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती येथे १७ महारक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमधून ९ हजार २६१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे. अमरावती येथील या स्थानिक शिबिराची भर पडल्याने एकूण संकलित रक्त पिशव्यांची संख्या १० हजार ५५९ वर पोहोचली आहे, ज्यामुळे १० हजारांचा टप्पा पार करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची दखल स्टेट ब्लड ट्रान्सफ्यूजन महाराष्ट्र, मुंबई यांनी घेतली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *