Headlines

घराघरातील मोबाइलमुळे लहान मुलांचे बालपणही हिरावले गेले:आईवडिलांनी मुलांना वेळ दिलाच पाहिजे, राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन‎




घराघरात आलेल्या मोबाइलने बालकांचे बालपण हिरावून घेतले आहे. आजच्या काळातील उपलब्ध सुख साधनांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करायचा हे कळले पाहिजे. बालमनावर सुसंस्कार करण्यासाठी मातापित्यांनी वेळ दिलाच पाहिजे.‌ करिअरच्या मागे धावताना उत्तम जगण्याचा आनंद घेणे राहून गेले, असे व्हायला नको. ज्या घरात महिला आनंदी असतात त्याच घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील सर्वांनी एक-दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला तर संपूर्ण परिवार सुखी होतो. इतरांचे दोष पहाण्यापेक्षा आपण आपलेच दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले. रामनिवास सतीशचंद्र इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सातवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भाविकांना मार्गदर्शन करताना राधाकृष्ण महाराज म्हणाले, गोवर्धन पूजा उत्सव हा श्रीकृष्ण दर्शनाचा उत्सव आहे. सुदामाने श्रीकृष्णासाठी स्वतःकडे दारिद्र्य ओढवून घेतले. सकाळी उठल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाचे नाव घ्यावे. दररोज श्रीकृष्णांचे चरणामृत घ्यावे. गंगाजल घ्यावे. आपल्या कल्याणाचा मार्ग सोपा होतो. देवघरात मूर्ती, फोटोतील चित्र पाहू नका तर प्रत्यक्ष देवच बसले आहेत, असा भाव ठेवा. भगवंताच्या नामस्मरणाचे, त्यांच्या दर्शनाचे सुख अनुभवा. आपण मंदिराची पायरी चढलो तरी आपले अमंगल नष्ट होण्यास सुरुवात होते. संसारातील विषय सतावू लागले की, भगवान श्रीकृष्णांचे दर्शन करा. सांदिपनी आश्रमात ६४ कलांचे ज्ञान संपादन केलेल्या श्रीकृष्णांच्या सद्गुणांना समजून घेण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. भागवत कथा श्रवण करण्यासाठी शहर आणि उपनगरासह जिल्ह्यामधून आणि जिल्ह्याबाहेरूनही भाविक आल्याने गर्दीचा उच्चांक होत राहिला. उपस्थित सर्वांसाठी उत्तम, सात्विक आणि दर्जेदार महाप्रसादाची व्यवस्था इंदाणी परिवारातर्फे करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिपूर्ण वातावरणात कथा सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *