Headlines

महावितरण कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप:संचालक राजेंद्र पवार यांचे सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन




महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले. यावेळी त्यांनी दैनंदिन कामात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि विद्युत अपघात टाळण्याचे आवाहन केले. हे वाटप बुधवार, १९ ऑगस्ट रोजी शहर व ग्रामीण मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. पवार यांनी सांगितले की, महावितरणच्या प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. अपघातामुळे कर्मचाऱ्यासोबतच त्याच्या कुटुंबालाही मोठे नुकसान होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरणे अनिवार्य आहे. केंद्रीय स्तरावर दर्जेदार सुरक्षा साहित्य खरेदी करून ते सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी त्याचा नियमित वापर करून ग्राहकांना अखंडित सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान, संचालक पवार यांनी दोन्ही मंडळांतील मानव संसाधन (HR) विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. त्यांनी कल्याणकारी योजना शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनेल आणि शिस्तभंगाच्या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश दिले. यावेळी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या सहा वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी तांत्रिक कर्मचारी ज्योती तोगे, अभय एरंडे आणि विशाल घायाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तंत्रज्ञ वैभव साखरे यांनी सुरक्षा साहित्याबद्दल आभार मानत ‘अपघातमुक्त कामकाजाचा’ संकल्प केला. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, गोरक्षनाथ सपकाळे, महेश पवार, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, शंकर कुलकर्णी, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांच्यासह दोन्ही मंडळांतील कार्यकारी अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटणी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. शिवाजी तिकांडे यांनी केले, तर अश्विनी पोतलवाड यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *