![]()
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारे ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026’ जाहीर झाले आहेत. यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ‘सकाळ’चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच, सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी मोनेश शेलार यांचा सन्मान केला जाईल. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि ‘डीईएस’च्या नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या पुरस्कारांचे वितरण येत्या शनिवारी, 22 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. दिल्लीतील लेखक, बस्तरचे रहिवासी आणि नक्षलवादाचे अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. या सोहळ्यात राजीव रंजन प्रसाद ‘नक्षलवादी चळवळ- काल आणि आज’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सांगितले की, देवर्षी नारद यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे हे 14 वे वर्ष आहे. पत्रकारितेतील सातत्यपूर्ण विश्लेषणात्मक लिखाण आणि व्यासंगी अभ्यासक म्हणून श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ (31 हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती) देऊन गौरविण्यात येणार आहे. विज्ञान, हवामान आणि पर्यावरण पत्रकारितेतील अग्रगण्य योगदानाबद्दल मयुरेश प्रभुणे यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान केला जाईल. तर, धडाडीच्या बातमीदारीबद्दल अंजली खमितकर यांनाही हाच पुरस्कार मिळेल. या दोन्ही पुरस्कारांमध्ये प्रत्येकी 21 हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती दिली जाते. समाजमाध्यमांवर प्रेक्षकांना भावणारी आणि रुचणारी तथ्यात्मक मांडणी केल्याबद्दल मोनेश शेलार यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांना 21 हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती देऊन सन्मानित केले जाईल. या पत्रकार परिषदेत आनंद काटीकर यांनी ‘डीईएस’ पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सध्या माध्यम क्षेत्रात केवळ बातमीदारीच नव्हे, तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी आवश्यक असलेल्या फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
Source link
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026 जाहीर:श्रीधर लोणी, अंजली खमितकर, मयुरेश प्रभुणे, मोनेश शेलार यांचा 22 ऑगस्टला सन्मान