Headlines

घाटी रुग्णालयात मेकॅनिक बांधवांची आगळीवेगळी 'रुग्णसेवा'!:गेल्या तीन महिन्यांपासून स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची मोफत दुरुस्ती




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गेल्या तीन महिन्यांपासून औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने आगळीवेगळी रुग्णसेवा पुरवली जात आहे. या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील स्ट्रेचर, व्हीलचेअर, पेशंट बेड आणि टेबल यांची मोफत दुरुस्ती केली जात आहे. असोसिएशनचे सदस्य आठवड्यातून एकदा ओपीडी, अपघात विभाग, मेडिसिन वॉर्ड आणि कर्करोग रुग्णालयाला भेट देतात. येथे ते खराब झालेले साहित्य दुरुस्त करून आरोग्यसेवेत महत्त्वाचा हातभार लावत आहेत. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चांद सय्यद यांच्या संकल्पनेतून हे कार्य सुरू झाले आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील मेकॅनिक बांधव एकत्र येत ही सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक दुरुस्ती मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. ७ ऑगस्ट रोजी ओपीडी आणि मेडिसिन वॉर्डमधील ५ स्ट्रेचर, १२ पेशंट बेड आणि ६ खुर्च्यांची दुरुस्ती करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी वैजापूर व छत्रपती संभाजीनगर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्जिकल बिल्डिंग आणि अपघात विभागात काम केले. यात पेशंट बेड, सलाईन स्टँड, व्हीलचेअर आणि स्ट्रेचरचे वेल्डिंग, नटबोल्ट घट्ट करणे, ग्रीसिंग आणि चाके बदलून देण्याचे काम समाविष्ट होते. १९ ऑगस्ट रोजी वॉर्ड क्र. २२ (जळीत रुग्ण कक्ष) आणि वॉर्ड क्र. २५ (बाल रुग्ण कक्ष) येथेही दुरुस्तीची सेवा देण्यात आली. या सेवाभावी कार्यात वैजापूर संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम कालू शहा, सचिव इसाक कालू शहा, अबुजर शहा, आयान पठाण यांच्यासह छत्रपती संभाजीनगर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई, शेख नूर, शेख सरवर खान, शेख जमीर, शेख सलीम, महाराष्ट्र इंजिनिअर वर्कचे शेख जाफर शेख हबीब आणि जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राम पारखे आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *