Headlines

बडनेरा येथे शर्मा कुटुंबीयांच्या घर, फार्म हाऊसवर धाडी




बडनेरा परिसरात अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने चार पथक तयार करुन आज, गुरुवारी वेगवेगळ्या चार ठिकाणी धाडी घातल्या. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे व कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ही कारवाई करण्यात आली. येथील विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनात ही धडक कारवाई करण्यात आली. सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार बडनेरा परिसरात बेकायदेशीररीत्या सावकारीचा व्यवसाय सुरु होता. त्याला अनुसरुन सहकार विभागाने आज चार पथक तयार करुन ते वेगवेगळ्या चार ठिकाणी पाठविले. ज्यांच्याविरुद्ध तक्रार होती, त्यांची बडनेरा (सुभाष चौक) येथील दोन घरे, नव्या वस्तीतील निवासस्थान आणि बडनेरा रोडवरील फार्महाऊस या ठिकाणी एकाचवेळी ही पथके पोहोचली. झडतीदरम्यान दोन ठिकाणी काही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही, असे संबंधित पथकांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पथकांमध्ये तिवसा येथील सहायक निबंधक प्रिती धामणे, नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे, सहकार अधिकारी (श्रेणी-१) अविनाश महल्ले, इतर अधिकारी महेश चक्रे, शिल्पा सातपुते, हरीभाऊ भुमरे, पंच उमेश काळे व कृणाल भुसारी, लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी निहाल राऊत व दीपाली भोंडे यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील चौकशी व तपास सुरु करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *