![]()
पेप्सिको इंडियाच्या पुणे येथील उत्पादन प्रकल्पाने 25 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. 2001 मध्ये सुरू झालेल्या या 15 एकरच्या प्रकल्पात कंपनीने आतापर्यंत 600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे 1,400 जणांना रोजगार मिळाला आहे. सध्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 62 हजार 100 टन आहे. पुण्यातील या प्रकल्पात लेज, कुरकुरे, चिटोस, सॉल्ट मस्ती आणि अंकल चिप्स यांसारख्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांचा पुरवठा प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भारतातील ग्राहकांना केला जातो. गेल्या 25 वर्षांत प्रकल्पाची उत्पादन क्षमता सहापट वाढली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठादार आणि पूरक उद्योगांच्या वाढीलाही चालना मिळाली आहे. पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागृत कोटेचा यांनी पुणे प्रकल्प कंपनीच्या भारतातील विकासातील महत्त्वाचा भाग असल्याचे नमूद केले. देशातील पहिली स्वयंचलित पॅलेटायझेशन प्रणाली, बटाट्यांचे डिजिटल स्वयंचलित प्रतवारीकरण आणि पाणी पुनर्वापराच्या तंत्रज्ञानाची सुरुवात पुणे प्रकल्पातून झाली आहे. हा प्रकल्प शाश्वत उत्पादनावर विशेष भर देतो. पुणे प्रकल्पाला सध्या 98.6 टक्के वीज अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे मिळते. गेली सलग सहा वर्षे प्रकल्पाने ‘शून्य कचरा भूमीभरणी’चा दर्जा कायम ठेवला आहे. नोव्हेंबर 2022 पासून हा प्रकल्प ‘शून्य द्रव सांडपाणी विसर्गा’च्या तत्त्वावर कार्यरत आहे. पाणी पुनर्वापराच्या तंत्रज्ञानामुळे वर्षाला सुमारे 25.5 लाख लिटर पाण्याची बचत होत आहे, जी जवळपास 1,300 कुटुंबांच्या वार्षिक पाणी गरजेइतकी आहे. तसेच, सहा गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या जलसंधारण उपक्रमाचा सुमारे 15 हजार नागरिकांना लाभ होत आहे. गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीत पुणे प्रकल्पाने केवळ उत्पादनावरच नव्हे, तर रोजगारनिर्मिती, स्थानिक आर्थिक विकास, जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींवरही भर दिला आहे.
Source link
पेप्सिको इंडियाच्या पुणे प्रकल्पाला 25 वर्षे पूर्ण:1,400 जणांना रोजगार, 600 कोटींहून अधिक गुंतवणूक