Headlines

ठाण्यात बिल्डरला 4.95 कोटींचा गंडा; 52 फ्लॅट्स विकून दलालांचा पोबारा:दलालीचे आमिष दाखवून व्यावसायिकास फसवले




एका बांधकाम व्यावसायिकाची ४.९५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील फ्लॅट्स नाममात्र दलाली घेऊन विकून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींनी ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नदीम शेख आणि अख्तर हुसेन बेग यांनी त्याच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील फ्लॅट्स कमी शुल्कात विकून देण्याचे आश्वासन देऊन त्याचा विश्वास संपादन केला. तक्रारदाराच्या अनुपस्थितीत एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२६ या काळात या दोघांनी ग्राहकांसोबत स्वतःच्या नावावर बेकायदेशीर विक्री करार केले. त्यांनी ५२ फ्लॅट्स विकून पैशांचा अपहार केला आणि विकासकाची तब्बल ४.९५ कोटी रुपयांची फसवणूक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि इतर संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. फाइल डाऊनलोड केल्याने डॉक्टरला ६० हजारांचा बसला फटका ऑनलाइन डिलिव्हरीच्या बहाण्याने ठाण्यातील एका डॉक्टरची ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांनी एका सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा येथे राहणारे तक्रारदार अब्दुल वाहिद जलालुद्दीन सिद्दिकी (४६) यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲपवर त्यांच्याशी संपर्क साधला आणि एक फाइल पाठवली. ही फाइल उघडताच त्यांच्या खात्यातून पैसे लंपास झाले. मॅट्रिमोनियल साइटवर तरुणाकडून ठाण्यात महिलेस ६ लाखांचा गंडा मॅट्रिमोनियल वेबसाइटवर ओळख झालेल्या एका तरुणाने ठाण्यातील २८ वर्षीय महिलेची ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तक्रारदार महिलेची या वर्षाच्या सुरुवातीला आरोपी अजय अमोल पाटील (२९, रा. मुंबई) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर पाटील याने तिला क्लब मेंबरशिप कार्ड मिळवून देण्याचे आमिष दाखवत ६ लाख उकळले. एनपीसीआय अधिकारी असल्याची बतावणी करत १.४६ कोटीचा गंडा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे भासवून दोन भामट्यांनी ठाण्यातील एका ५२ वर्षीय व्यक्तीची १.४६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी त्याला पॉलिसी प्रीमियमचा परतावा मिळवून देण्याचे आणि गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. ५ सप्टेंबर २०२४ ते या वर्षीच्या ११ ऑगस्ट दरम्यान आरोपींनी या व्यक्तीला लक्ष्य केले. पॉलिसीच्या प्रीमियमचा परतावा आणि त्यासोबतच मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *