Headlines

300 वर्षांची परंपरा:शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला मोठी गर्दी‎, मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र‎




प्रतिनिधी | खामगाव बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर अर्थात शिरसाळा मारुती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या जागृत देवस्थानाकडे आता खामगावसह बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात ओढा वाढताना दिसून येत आहे. विशेषतः प्रत्येक शनिवारी खामगाव शहर व परिसरातून अनेक भाविक शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोदवड शहरापासून मुक्ताईनगर मार्गावर उत्तरेकडे सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर नदीकाठी हे प्राचीन मंदिर वसले आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराची स्वयंभू हनुमान मूर्ती हे प्रमुख आकर्षण मानले जाते. शेंदूरचर्चित पाषाण शिळेच्या स्वरूपातील ही मूर्ती उघड्या आकाशाखाली ऊन, वारा आणि पाऊस सहन करत अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे. शिरसाळा मारुती मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा असून मनोभावे प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होते, अशीही भाविकांमध्ये भावना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती दूरवर पसरत असून खामगाव-बुलढाणा परिसरातील भाविकांच्या धार्मिक पर्यटनाच्या यादीत शिरसाळा मंदिराचा समावेश होताना दिसत आहे. श्रावण व मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात भाविकांची विशेष गर्दी होते. हनुमान जयंतीनिमित्त येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम व जत्रेचे आयोजन केले जाते. पंचक्रोशीसह दूरवरच्या भागातून हजारो भाविक या उत्सवासाठी शिरसाळा येथे दाखल होत असतात. हनुमान भक्तांसाठी शनिवारचा दिवस विशेष मानला जात असल्याने शिरसाळा मंदिरात प्रत्येक शनिवारी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक खासगी वाहनांनी तसेच समूहाने मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *