![]()
राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘समृद्धी महामार्ग’ आणि प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या महामार्गांच्या नावाखाली राज्यात हजारो कोटी रुपयांचा खेळ सुरू असून, यातून जनतेला समृद्धी आणि शक्ती मिळणार की केवळ काही ठराविक कंत्राटदारांचीच ‘समृद्धी’ होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी का? प्रकल्पांच्या पारदर्शकतेवर आणि निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पांमध्ये नेमके कंत्राटदार कोण आहेत? एवढ्या मोठ्या कामांसाठी कोणतीही निकोप स्पर्धा का घेतली जात नाही? मोजक्याच आणि ठराविक कंत्राटदारांना वारंवार कामे देण्यामागचे सरकारचे नेमके कारण काय आहे?” असा थेट आरोप करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. ५०० कोटींचे काम ३०० कोटींत सबलेट! कामांच्या वाटपातील आर्थिक गणितावर बोट ठेवत वडेट्टीवार यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले, “एखादे काम ५०० कोटी रुपयांना घेतले जाते आणि पुढे तेच काम दुसऱ्याला ३०० कोटी रुपयांमध्ये ‘सबलेट’ केले जाते. जर काम ३०० कोटींत होत आहे, तर मग उरलेले २०० कोटी रुपये कुठे जातात आणि कुणाच्या खिशात जातात? या संपूर्ण प्रक्रियेची अत्यंत पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे. तसेच, या महामार्गांच्या कामाचा दर्जाही तपासला गेला पाहिजे.” ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा पैसा कुठे आणि कसा खर्च होतोय, याचा संपूर्ण हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला मिळालाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. पवार-मोदी भेटीवर सूचक भाष्य दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीवरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, “या भेटीबाबत आम्हाला सगळे काही माहिती आहे, पण आज आम्ही त्यावर काहीही बोलणार नाही. आम्हाला या भेटीचा कोणताही राग येणार नाही, कारण शरद पवारांचे विचार हे आमच्यासोबतच आहेत,” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. हेही वाचा.. आमदार-खासदार फोडायला रातोरात खोके जातात: मग कर्जमाफीला विलंब का? रोहित पवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “आमदार आणि खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात, मात्र जेव्हा विषय अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा येतो, तेव्हाच सरकारला विलंब का होतो?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट करत सरकारच्या संथ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. सविस्तर वाचा
Source link
महामार्गांच्या नावाखाली हजारो कोटींचा खेळ:35 हजार कोटींच्या प्रकल्पांचा हिशेब द्या, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात