![]()
जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात रविवारी दुपारी एका मोठ्या अनर्थाची शक्यता थोडक्यात टळली. छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसला या घाटात भीषण अपघात झाला. तब्बल 59 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस थेट खोल दरीत कोसळण्यापासून बचावल्याने एकच खळबळ उडाली आणि सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या अपघाताचे मुख्य कारण बसमध्ये अचानक झालेला तांत्रिक बिघाड असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रविवारी दुपारी ही बस कन्नड घाटातील धोकादायक वळणांवरून जात असताना तिचे स्टीअरिंग अचानक जॅम झाले किंवा स्टीअरिंगचा रॉड तुटला. घाटातील उतार आणि बसचा वेग यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण क्षणाधार्त पूर्णपणे सुटले. नियंत्रण सुटलेली ही बस थेट रस्त्याच्या कडेला गेली आणि घाटातील संरक्षक कठड्याला जाऊन जोरदार धडकली. सुदैवाने, या भयानक धडकेनंतर बस दरीत न कोसळता त्या कठड्यावरच अडकून राहिली. जर हा कठडा नसता किंवा बस पुढे गेली असती, तर ती थेट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली असती. प्रवाशांनी खिडकीतून टाकल्या उड्या अपघात घडताच बस दरीच्या दिशेने झुकल्याचे पाहून आतील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि एकच आरडाओरड सुरू झाली. मात्र, या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रसंगातही काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तत्काळ बसच्या खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. एकामागोमाग एक सर्वच प्रवासी खिडकीतून सुरक्षितपणे बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव या थरारक अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून, केवळ चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बस दरीत न कोसळल्याने आणि प्रवाशांनी अत्यंत आणीबाणीच्या क्षणी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका भीषण दुर्घटनेचा मोठा धोका टळला. अपघातामुळे घाट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र सर्व 59 प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अपघाताचा प्राथमिक अंदाज जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेची अधिकृत माहिती देताना सांगितले की, अपघातग्रस्त बसमधून एकूण 59 जण प्रवास करत होते. यापैकी केवळ चार जणांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, धावत्या गाडीचा स्टीअरिंग रॉड तुटल्यामुळे किंवा स्टीअरिंग अचानक जॅम झाल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आता तज्ज्ञांकडून बसची सविस्तर तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. एसटीच्या तांत्रिक स्थिती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे घाट मार्गांसारख्या अतिधोकादायक रस्त्यांवरून धावणाऱ्या एसटी बसेसच्या तांत्रिक स्थितीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसटी महामंडळाकडून गाड्यांचे स्टीअरिंग, ब्रेक आणि इतर अत्यावश्यक यंत्रणांची नियमित व काटेकोरपणे तपासणी केली जाते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सुदैवाने यावेळी बस कठड्यावर अडकली आणि प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले; अन्यथा तांत्रिक देखभाल-दुरुस्तीतील या संभाव्य हलगर्जीपणामुळे 59 प्रवाशांच्या जीवावर मोठे संकट ओढवले असते. ही बातमी देखील वाचा भिवंडी-कल्याण बायपासवर ट्रकला आग:मंत्री गिरीश महाजन यांची तत्काळ धाव, मदतीच्या केल्या सुचना भिवंडी-कल्याण बायपासवर धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. दरम्यान, याच मार्गावरून जात असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक आदेश दिले. वाचा सविस्तर
Source link
कन्नड घाटात मोठा अनर्थ टळला:59 प्रवाशांनी भरलेली एसटी बस दरीत कोसळता-कोसळता वाचली!