![]()
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) चा रौप्यमहोत्सव पूर्ती आणि कृतज्ञता सोहळा रविवारी मुंबईत उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या एमकेसीएलने २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या सोहळ्यात एमकेसीएलच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला चालना देणाऱ्या दिशादर्शक कार्याबद्दल पद्मश्री प्रतापराव पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. भालचंद्र मुणगेकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, विलास शिंदे, डॉ. सी.डी. मायी, डॉ. अनंत सरदेशमुख आणि ओमजीवन गुप्ता आदी मान्यवरही उपस्थित होते. एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, राज्यात २ कोटी जणांनी एमएससीआयटी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एमकेसीएल आता २५ हजार कर्मचाऱ्यांचे कुटुंब बनले आहे. संस्थेत सध्या १२५ एआय टूल्स आणि २५० डिजिटल कौशल्ये शिकवली जात आहेत. एमकेसीएलचा विस्तार १७ राज्यांमध्ये आणि परदेशातही झाला आहे. रौप्यमहोत्सव सोहळ्यात एमकेसीएलच्या विविध नव्या उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. यामध्ये ‘एमकेसीएल क्रांती’, ‘एआय असिस्टेड इंटर्नशिप फ्रेमवर्क’, ‘लर्न लाइव्ह’, ‘पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऍग्री आंत्रप्रेन्युअरशिप’, ‘महा एआय मास्टरक्लास’ आणि ‘व्हिजन डॉक्युमेंट फॉर हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन’ यांचा समावेश आहे. ‘जीवघेण्या शेतीकडून समृद्ध शेतीकडे’ आणि ‘संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. इंडियन डिजिटल फाईन आर्टस् या उपक्रमाचे अनावरण तसेच एमकेसीएलच्या पेटंट्सची घोषणा यावेळी करण्यात आली. एमकेसीएलने तयार केलेल्या ‘हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन’ या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन झाले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी आणि अत्यावश्यक दिशा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले. महा एआय मास्टरक्लास या उपक्रमाचेही उद्घाटन झाले. एमकेसीएलच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतानाच भविष्यातील डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संस्थेच्या आगामी वाटचालीची दिशा या सोहळ्यात अधोरेखित करण्यात आली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “एमकेसीएलने आपला नावलौकिक जगात वाढवला आहे. या सर्वांना मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांनी राज्याच्या बाहेर सुद्धा काम केले आहे.”
Source link
एमकेसीएलचा रौप्यमहोत्सव सोहळा मुंबईत उत्साहात:शरद पवार म्हणाले, 'एआयबद्दल आस्था निर्माण व्हावी'