Headlines

उपमुख्यमंत्र्यांनी चाकणला भेट दिली, रस्ते दुरुस्तीची पाहणी केली:औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी रोडमॅप जाहीर




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. शिंदे यांनी तळेगाव आणि चाकण येथे भेट देऊन रस्त्यांच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली, तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिसआयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह अनेक उद्योजक आणि अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यांनी एम-६० हार्डनर वापरून खड्डे बुजवण्याचे काम आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याच्या कामाची पाहणी केली. या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी वेळात रस्ता पूर्ववत होऊन अवजड वाहनांसाठी खुला करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे उद्योजकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरण टिकत नसल्याने, यावर मात करण्यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. जिओ पॉलिमर मिश्रण अर्धा ते पाऊण तासात सेट होत असल्याने खड्डे भरल्यानंतर तातडीने वाहतूक सुरू करणे शक्य होते. तसेच, सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार असून, रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जाईल. चाकणमध्ये येणाऱ्या वाहनांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या 54 किलोमीटर मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्ते बांधणीला गती दिली जाणार आहे. रस्ते बांधताना फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅकचा समावेश करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. कामगारांच्या प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी औद्योगिक क्षेत्रात क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती (टाउनशिप) उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच निगडी ते चाकण, चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रो प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

उद्योजकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहतील. तसेच उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून लोडशेडिंगचे नियोजन करणे, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच पाणीपुरवठा व पोलिसप्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आले. शासनाच्या या सर्व उपाययोजनांमुळे उद्योजकांच्या समस्यांचे निवारण होऊन त्यांचे समाधान झाले असून, उद्योजकांनी आपले उद्योग बाहेर नेण्याबाबतचे मतपरिवर्तन झाल्याचे यावेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *