Headlines

मोर्शीत खळबळ!:बंद दुकानात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; ओळख पटवण्यासह मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान




मोर्शी येथील प्रभुदयाल सिनेमा टॉकीज परिसरातील एका वर्षापासून बंद असलेल्या दुकानात ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास शिवआप्पा गंजिवाले (वय ६२, रा. बीएसएनएल ऑफिसजवळ) यांच्या मालकीचे हे दुकान अनेक वर्षांपासून बंद होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे सतीश परसवाडे यांना दुकानातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी ही माहिती दुकान मालक हरिदास गंजीवाले यांना दिली. गंजीवाले यांनी दुकानात जाऊन पाहिले असता, छताच्या टिनावरून एक अज्ञात व्यक्ती खाली पडलेला दिसला. मृतदेहावर कथ्थई रंगाची चेक पॅन्ट आणि इंग्रजी रंगाचा शर्ट होता. मृतदेहाचा चेहरा आणि शरीर पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे शक्य झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. हा अनोळखी व्यक्ती बंद दुकानाच्या टिनावरून खाली कसा पडला आणि तो दुकानाच्या आत कसा पोहोचला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस या सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *