Headlines

पुणे येथे नाट्यछटा महोत्सव सुरू:७५ कलाकार सहभागी, लेखन-सादरीकरण-परीक्षण-परिसंवाद होणार




महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पुण्यात ‘नाट्यछटा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्योत्स्ना भोळे सभागृह,महाराष्ट्र कल्चरल सेंटर,टिळक रोड येथे हा महोत्सव दररोज सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. या महोत्सवात शिशु कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत एकूण 75 कलाकार सहभागी होणार असून,रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नाट्यछटा हा मराठी रंगभूमीतील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी नाट्यप्रकार आहे. अल्पावधीत आशयपूर्ण विषयाची प्रभावी मांडणी, अभिनय, संवाद आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत विचार पोहोचविण्याची क्षमता या कलाप्रकारात आहे. विविध वयोगटांतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत रसिकांना या कलाप्रकाराचा अनुभव मिळावा, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या तीन दिवसीय महोत्सवात नाट्यछटा लेखन, नाट्यछटा सादरीकरण, नाट्यछटा परीक्षण आणि परिसंवाद अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. नाट्यछटा लेखनासाठी मिलिंद सबनीस आणि संध्या कुलकर्णी, तर नाट्यछटा सादरीकरणासाठी विनिता पिंपळखरे आणि धनंजय सरदेशपांडे सहभागी होणार आहेत.नाट्यछटा परीक्षणाची जबाबदारी पुष्कर देशपांडे, गौरी लोंढे आणि सक्षम कुलकर्णी सांभाळणार आहेत. परिसंवादाचे समन्वय प्रकाश पारखी करणार आहेत. शिशु कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत विविध वयोगटांतील 75 कलाकारांचा सहभाग हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. विविध पिढ्यांतील कलाकारांना एकाच मंचावर आणून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नाट्यछटा या कलाप्रकाराच्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे जतन व संवर्धन करणे, नाट्यछटा या वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकाराला प्रोत्साहन देणे आणि विविध वयोगटांतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. पुणे व परिसरातील नाट्यरसिक, विद्यार्थी, कलाकार, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिकप्रेमींनी या तीन दिवसीय ‘नाट्यछटा महोत्सवा’चा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *