Headlines

सीईओंचा जिल्हाभर पाहणी दौरा:शाळा, अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणा, शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा




जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील मूलभूत सुधारणांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आग्रही झाले आहेत. त्यांनी जिल्हाभर पाहणी दौरा सुरू केला असून, आतापर्यंत सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीईओनी चांदूरबाजार, अमरावती आणि भातकुली तालुक्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा तालुक्यांचा दौरा केला. या पाहणी दौऱ्यात त्यांनी इमारतीची स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, कर्मचाऱ्यांची संख्या आणि पोषण आहाराचा पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सीईओनी दाभा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच जळू, धानोरा गुरव आणि माहुली चोर येथील जि.प. प्राथमिक शाळांची तपासणी केली. अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत त्यांनी केंद्रातील सुविधा, बालकांची उपस्थिती, आहार व्यवस्था आणि विविध उपक्रमांची माहिती घेतली. शाळेत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचे प्रभावी दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्याची सूचना त्यांनी केली. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि रिल्सच्या माध्यमातून माहिती सोशल मीडियावर पोहोचवण्याचे निर्देशही दिले. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता एक्सेल शीट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यांसारख्या डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्याला १०० टक्के दर्जेदार अध्ययन अनुभव मिळावा, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात सीईओंनी दाभा, माहुली चोर, जळू, धानोरा गुरव यासह एकूण सहा अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराची चव त्यांनी स्वतः चाखून पाहिली. तसेच आहारसाठा, स्वयंपाकगृह आणि साठवणूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. नवचेतना, आधारशिला, पालवी यांसारख्या उपक्रमांची माहितीही त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून जाणून घेतली. या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *