![]()
डफरीन जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. सोमवारी रुग्णालयात व्हेंटिलेटरला आग लागल्याने तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोंडे यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. ते म्हणाले की, “तीन लहान निष्पाप बाळांचा मृत्यू हा सामान्य मृत्यू नसून, हे शासन आणि प्रशासनाने घेतलेले बळी आहेत.” सरकारी रुग्णालयांमधील अनागोंदी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्तव्यातील दुर्लक्ष यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून आरोग्यमंत्री जबाबदार आहेत, असे पातोंडे यांनी नमूद केले. या घटनेनंतर आरोग्यमंत्री आबीटकर यांनी सोमवारी रुग्णालयाला भेट दिली होती, परंतु त्यांनी जबाबदारीबद्दल एकही शब्द काढला नाही, याकडे पातोंडे यांनी लक्ष वेधले. पोलिसांनी आरोग्यमंत्र्यांना दोषी मानून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. पातोंडे यांनी भंडारा येथील घटनेचा उल्लेख करत व्हेंटिलेटर पुरवठादार कंपनी ‘सीलर’बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्यामते, ही कंपनी सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवर उपलब्ध नाही, तरीही त्याच कंपनीकडून व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोग्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने हे निवेदन संबंधित यंत्रणेकडे पाठवल्याचेही स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीची चमू आजच येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असून, गरज भासल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाण्याचा इशाराही पातोंडे यांनी दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा निरीक्षक डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश पदाधिकारी विजय चोरपगार, दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकारी रमेश आठवले आदी उपस्थित होते. या आगीच्या घटनेवेळी रुग्णालयातील अलार्म वाजला नसल्याचे समोर आले आहे. अलार्म वाजला असता तर बचावकार्य तात्काळ सुरू झाले असते. मात्र, अलार्म कायमस्वरूपी बंद ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. उदबत्त्यांच्या धुरानेही अलार्म वाजत असल्याने ते बंद ठेवले असावे, असे बोलले जात आहे.
Source link
अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप