Headlines

मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती




अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या दिमतीला मुख्यमंत्र्यांचे दोन दूत (सीएम फेलो) रुजू झाले आहेत. मंगळवारपासून त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला (व्हीसी) उपस्थिती लावली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि सीईओंना प्रशासकीय मदत पुरवण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. अबोली प्रमोद बोरसे आणि आर्या दीपक बनकर अशी या दोन्ही दूतांची नावे आहेत. त्यांना गट-अ राजपत्रित अधिकारी दर्जाप्रमाणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेलोंना त्यांच्या कल्पकता, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून जिल्हा परिषद प्रशासनाला अधिक गतिमान व परिणामकारक बनवण्यासाठी मदत करायची आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भाग घेतला. यावेळी सीईओ सत्यम गांधी यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. संबंधित खातेप्रमुखांनी मुख्यमंत्री फेलोंसोबत प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या विभागातील विविध योजना, उपक्रम, कामकाज तसेच आगामी ध्येय-धोरणांची सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, सीएम फेलो रुजू झाल्यानंतर त्यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सीईओ सत्यम गांधी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार आवश्यक माहितीची देवाण-घेवाण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विभाग आणि पंचायत समिती कार्यालयात सहायक प्रशासन अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *