![]()
नागपूर शहरातील काँग्रेसचे नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, घराच्या काचा फुटल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मोटघरे हे नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेस नगरसेवक आहेत. वाठोडा परिसरातील श्रावणनगरमध्ये, स्वामीनारायण मंदिराच्या मागील बाजूस त्यांचे घर आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अशी घडली घटना नागपूरच्या वाठोडा परिसरातील श्रावणनगरमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुण मोपेडवरून शुभम मोटघरे यांच्या घराजवळ आले. दोघांनीही चेहरा झाकलेला होता. घराजवळ येताच त्यांनी मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर काही क्षणांतच ते मोपेडवरून वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबाराचा आवाज होताच घराची काच फुटली. त्यावेळी “मी बाल्कनीत होतो, तर माझी पाच वर्षांची मुलगी दरवाजाजवळ उभी होती,” अशी माहिती शुभम मोटघरे यांनी दिली. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेनंतर मोटघरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हल्लेखोर मोपेडवरून आल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, गोळीबार नेमका कोणत्या शस्त्राने करण्यात आला, यासह इतर बाबींचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. आरोपी कोणत्या दिशेने आले आणि गोळीबार केल्यानंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याचाही पोलीस तपास करत आहेत गोळीबार का केला काँग्रेस नगरसेवकाच्या घरावरच गोळीबार का करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला की त्यामागे राजकीय किंवा अन्य कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. लोकप्रतिनिधीच्या घरावर मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे श्रावणनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, सीसीटीव्ही आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हेही वाचा.. MPSC ची औषध निरीक्षक परीक्षा अखेर रद्द:पेपर 40 लाखांना विकला, अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार आक्रमक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच विद्यार्थ्याकडे होता हे दिलेले स्पष्टीकरण अजिबात पटण्यासारखे नाही, असा थेट निशाणा पवार यांनी साधला आहे.सविस्तर वाचा..
Source link
नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार:मोपेडवरून आले अन् गोळीबार करून पसार झाले;मध्यरात्रीचा थरार CCTV मध्ये कैद