![]()
मुंबईतील गणेशोत्सवाला सध्या येत असलेल्या कॉर्पोरेट स्वरूपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गणेशोत्सव हा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे. मात्र, लालबागचा राजा आणि चिंतामणी यांसारखी मंडळे उद्योगपतींना सल्लागार म्हणून नेमून गणेशोत्सवाला कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवत आहेत. उद्या गणेशोत्सवात आपण फक्त गरबा बघायचा का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवातील वाढते कॉर्पोरेट वर्चस्व, एमपीएससी पेपरफुटी आणि कंत्राटदारांचे रखडलेले पेमेंट यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित प्रशासनाला धारेवर धरले. ‘लालबागचा राजा’ मंडळ जबाबदार; इतिहास माफ करणार नाही गणेशोत्सवातील वाढत्या कॉर्पोरेट हस्तक्षेपाबद्दल बोलताना देशपांडे यांनी थेट ‘लालबागचा राजा’ मंडळावर निशाणा साधला. “गेल्या वर्षी लालबागचा राजा मंडळाने अनंत अंबानी यांना सल्लागार म्हणून नेमले. आता त्यांचे बघून अदानी आले, उद्या गोदरेज आणि जेएसडब्ल्यू येतील. लालबागच्या राजाकडे कोट्यवधींच्या देणग्या जमा होतात, मग तुम्हाला अंबानींची गरज काय? ते असा कोणता सल्ला देतात जो तुम्हाला आजवर मिळाला नाही?” “गणपती हा मार्केटिंगचा विषय नाही. अदानी-अंबानींसारखे उद्योगपती नफा दिसल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करत नाहीत. 50 वर्षांनंतर लालबागचा राजा ‘अंबानी गणपती’ आणि चिंतामणी ‘अदानी गणपती’ म्हणून ओळखले जातील, हे तुम्हाला चालणार आहे का? याला लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी जबाबदार असून त्यांना इतिहास माफ करणार नाही.” उंच मूर्ती आणि रस्त्यांवरील खड्डे: आत्मपरीक्षण करण्याची गरज नुकत्याच एका गणेशमूर्तीचा अपघात होऊन झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल बोलताना त्यांनी गणेश मंडळांना आणि सरकारला सुनावले. “2 फुटांचा गणपती नवस पूर्ण करत नाही आणि 23 फुटांचा गणपती करतो, असे कुठल्याही धर्मात सांगितलेले नाही. ही फक्त पैशांची आणि उंचीची स्पर्धा आहे. सरकार नालायक आहे आणि ते रस्त्यावरील खड्डे बुजवणार नाही, हे माहीत असूनही आपण मूर्तीची उंची वाढवून बाप्पाला आणि कार्यकर्त्यांच्या जिवाला धोक्यात का टाकतोय? आपण समाज म्हणून आत्मपरीक्षण केले पाहिजे.” एमपीएससी पेपरफुटीवरून सरकारला घेरले पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पेपरफुटीचे पुरावे दिल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा होण्याच्या काही दिवस आधीच पेपर फुटल्याचे समोर आले. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, पेपरफुटी मान्य झाल्यानंतरही गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “पोलिसांकडे तक्रार आहे, पुरावे आहेत आणि पेपर फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, तर एफआयआर दाखल करण्यास विलंब का?” असा प्रश्न त्यांनी केला. पेपरफुटीमागे केवळ एक व्यक्ती आहे की त्यामागे मोठी साखळी आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संबंधित व्यक्तीला अटक का करण्यात आली नाही, त्याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही आणि तपासात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, याची सरकारने उत्तरे द्यावीत, असे ते म्हणाले. पुनर्परीक्षा घेताना पूर्ण पारदर्शकता ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. एनआयसीयूमधील बाळांच्या मृत्यूवर चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरही देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केले. एनआयसीयूमध्ये इनक्युबेटर किंवा संबंधित उपकरणातील दुर्घटनेत तीन बाळांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी संबंधित उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेची आणि तांत्रिक गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली. यापूर्वी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचा दावा करत हा अहवाल आरोग्य विभागाने तातडीने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. “उपकरणाच्या तांत्रिक तपशीलानुसार त्याची खरेदी झाली होती का? उपकरण सदोष होते का? जर दोष आढळला तर संबंधितांवर कारवाई का झाली नाही?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मराठी रिक्षाचालकांच्या प्रश्नावरही भूमिका मुंबईतील रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरही देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट केली. परवाना मिळवण्यासाठी मराठी बोलता येणे ही कायदेशीर अट असेल तर त्याला सक्ती म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. रिक्षाचालकांना तत्काळ परवाने रद्द करण्याऐवजी आवश्यक वेळ दिला जात असल्याचे सांगत त्यांनी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. ‘महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे पैसे थकले, बाहेरच्या कंत्राटदारांना पेमेंट कसे?’ राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकांच्या मुद्द्यावरूनही देशपांडे यांनी सरकारवर टीका केली. अनेक कंत्राटदारांची कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांची बिले प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. “गुजरातमधून आलेल्या कंत्राटदारांना पैसे मिळतात आणि महाराष्ट्रातील कंत्राटदारांना पेमेंट का होत नाही?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. काही प्रकल्पांमध्ये कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाही संबंधित कंत्राटदारांना देयके मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे महाराष्ट्रातील कंत्राटदारांची देयके रखडली असल्याचे ते म्हणाले. आदिवासी विभागातील विकासकामांची देयकेही मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचा दावा करत सरकारने या संपूर्ण विषयावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा… बाई एवढी माया आली कुठून?:35 कोटींचे हॉटेल कसे उभारले?’ रुपाली चाकणकरांच्या ‘द नाइन्स’वर काँग्रेस नेत्या संगीता तिवारींचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नव्या हॉटेल व्यवसायाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरात ‘द नाईन्स’ नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून, त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. या हॉटेलच्या कथित किंमतीवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
गणपतीत आता गरबा खेळायचा बाकी राहिलाय!:लालबागचा राजा मंडळावर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; म्हणाले- मराठी सण गुजरात्यांच्या हातात देणार का?