Headlines

कुंभमेळ्याला 35 हजार कोटी, पण रुग्णालयांना निधी नाही:अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशावरही सूचक वक्तव्य




अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. “एकीकडे कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी रुपये खर्च केले जातात, पण राज्यातील आरोग्य आणि शिक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. हे सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी पूर्णपणे असंवेदनशील झाले आहेत,” असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रुग्णालयातील ढिसाळ कारभार, सदोष व्हेंटिलेटर आणि सरकारची उदासिनता यांवरून प्रशासनाला खडे बोल सुनावले. बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? “2022 मध्येही अशीच घटना घडली होती, तेव्हा समिती नेमून एका महिन्यात अहवाल देऊ असे सांगण्यात आले होते. आज चार वर्षे उलटली तरी अहवालाचा पत्ता नाही. आता नऊ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा समित्यांचा फार्स केला जात आहे. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे.” “या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तरच ही यंत्रणा वठणीवर येईल. येत्या आठ दिवसांत सरकारने जबाबदारी निश्चित करून कारवाई न केल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसू,” असा इशारा त्यांनी दिला. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात यावी. तसेच, केवळ 8,000 रुपये मानधनावर काम करणाऱ्या ज्या कंत्राटी परिचारिकेने स्वतःचा जीव धोक्यात घालून अंधारात 6 बालकांचे प्राण वाचवले, तिला शासनाने 5 लाख रुपयांचे विशेष बक्षीस द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. व्हेंटिलेटर आणि मेडिकल कॉलेजवरून सवाल “मला मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील व्हेंटिलेटर चीनमधून मागवले असून ते डुप्लिकेट असू शकतात. हेच व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून आले आहेत का? याची तातडीने चौकशी करून ते फेकून द्या आणि नवीन व्हेंटिलेटर लावा. अमरावतीसाठी मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या जागेवरून सत्ताधारी आमदारांमध्येच वाद सुरू आहेत. प्रत्येकाला कॉलेज आपल्या सोयीच्या जागी आणि जमिनीचे भाव वाढवण्यासाठी हवे आहे. गरिबांच्या जिवाची कुणालाही पर्वा नाही.” कुंभमेळ्याच्या खर्चावरून सरकारला सवाल वडेट्टीवार यांनी आरोग्य आणि शिक्षणासाठी निधीच्या उपलब्धतेचा मुद्दा उपस्थित करत कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ₹35,000 कोटींच्या खर्चाचा संदर्भ देत, एवढा मोठा निधी धार्मिक आयोजनासाठी उपलब्ध होत असेल तर आरोग्य आणि शिक्षणासाठी काही हजार कोटी रुपये उपलब्ध का होत नाहीत, असा सवाल केला. कुंभमेळ्याला काँग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत, धार्मिक आयोजनाबरोबरच शाळा, रुग्णालये, डॉक्टर, शिक्षक, पिण्याचे पाणी, शौचालये आणि मूलभूत सुविधा यांनाही प्राधान्य मिळायला हवे, असे त्यांनी म्हटले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या कंत्राटांबाबतही त्यांनी आरोप केले. काही कंत्राटे बाहेरील कंत्राटदारांना देऊन पुढे ती कमी रकमेत दुसऱ्या कंत्राटदारांकडे सोपवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. छोट्या कंत्राटदारांचे पैसे थकवल्याचा आरोप राज्यात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची पॅकेजेस दिली जात असताना छोट्या कंत्राटदारांची बिले थकवली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. नांदेडमधील एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला. मोठ्या कंत्राटदारांना मोठी कामे देण्यासाठी पैसा उपलब्ध असतो; मात्र छोटे कंत्राटदार, शेतकरी आणि इतर घटकांना देयके देण्यासाठी निधी नसल्याचे चित्र असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार काँग्रेससोबत येणार? वडेट्टीवार म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार काँग्रेससोबत येणार असल्याच्या चर्चेबाबतही वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी रोहित पवार हे पुरोगामी विचारांचे नेते असल्याचे सांगत, ते महाविकास आघाडीच्या विचारांसोबत असल्याचा दावा केला. रोहित पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा की नाही, हा त्यांचा निर्णय असल्याचे स्पष्ट करत, मात्र ते आघाडीच्या सोबत राहिले तर काँग्रेस त्यांचे स्वागत करेल, असे वडेट्टीवार म्हणाले. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी इतकी गंभीर घटना घडूनही पालकमंत्री आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी घटनास्थळी आले नसल्याबद्दल वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. एखाद्या जिल्ह्यात इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले. अमरावतीतील सत्ताधारी आमदारांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. 8 दिवसांत निर्णय नाही तर रस्त्यावर उतरू अमरावतीतील घटनेवरून सरकारला आता ठोस कारवाई करावीच लागेल, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे 8 दिवसांत चौकशी पूर्ण करणे, दोषींची जबाबदारी निश्चित करणे, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे, मृत बालकांच्या कुटुंबीयांना किमान 25 लाख रुपयांची मदत देणे आणि बालकांना वाचवणाऱ्या परिचारिकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा पुरस्कार देणे. याशिवाय राज्यातील रुग्णालयांचे अग्निसुरक्षा आणि आरोग्य सुविधांचे नियमित ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली. ऑडिटची मुदत संपण्यापूर्वीच ते पूर्ण झाले पाहिजे, असे ते म्हणाले. चौकशीमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी विरोधी पक्षातील 2 प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र आरोग्यमंत्र्यांना देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हेही वाचा… मुंबईच्या आमदारांचं ‘प्रगतीपुस्तक’ जाहीर: प्रजा फाउंडेशनच्या अहवालात काँग्रेसचे अमीन पटेल अव्वल, आदित्य ठाकरे 18व्या स्थानी, शिंदे गट-भाजपचे आमदार तळात मुंबईतील 36 आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक आमदार प्रगती अहवाल 2026 जाहीर झाला आहे. या अहवालात मुंबईच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आमदार किती सक्रिय आहेत, नागरिकांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडले जातात, सभागृहातील उपस्थिती, प्रश्न विचारण्याची कामगिरी, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *