![]()
सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या किरकोळ दरात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, काही बाजारपेठांमध्ये दर किलोमागे 65 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यातच साखरेची वाढती मागणी आणि उपलब्ध साठ्यावर निर्माण झालेल्या दबावामुळे डी-मार्ट, ब्लिंकइट, बिगबास्केट आणि स्विगी इन्स्टामार्टसारख्या रिटेल व क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साखर खरेदीला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एका व्यवहारात साधारण 3 ते 5 किलोपर्यंतच साखर खरेदी करता येत आहे.
साखरेच्या वाढत्या किमती आणि उपलब्धतेवर निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम आता ऑनलाइन किराणा आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही दिसून येत आहे. ब्लिंकिट, बिगबास्केट आणि Swiggy इन्स्टामार्टवर काही निवडक ब्रँडच्या साखरेच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एका ऑर्डरमध्ये ठराविक प्रमाणातच साखर खरेदी करता येत आहे. ब्लिंकिट, बिगबास्केट, इन्स्टामार्टवर साखरेच्या खरेदीवर मर्यादा दिल्ली-NCRमध्ये ब्लिंकिटवर काही विशिष्ट ब्रँडच्या साखरेच्या खरेदीवर मर्यादा लागू करण्यात आली आहे. मावाना प्रीमियम क्रिस्टल शुगर आणि धामपूर क्रिस्टल व्हाइट शुगरसारख्या उत्पादनांसाठी एका व्यवहारात जास्तीत जास्त 5 किलोचा एक पॅक खरेदी करता येत आहे. काही ठिकाणी संबंधित उत्पादनांचा साठा मर्यादित असल्याची सूचनाही ग्राहकांना देण्यात येत आहे. पुण्यात ब्लिंकिटवर साखरेच्या खरेदीसाठी वेगळी मर्यादा दिसून येत आहे. ग्राहकांना शॉपिंग कार्टमध्ये 1 किलोचे जास्तीत जास्त तीन पॅक जोडण्याची परवानगी आहे. म्हणजेच एका ऑर्डरमध्ये जास्तीत जास्त 3 किलो साखर खरेदी करता येत आहे. बिगबास्केटनेही काही निवडक ब्रँडच्या साखरेसाठी खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे. काही उत्पादनांसाठी ग्राहकांना 1 किलोचे जास्तीत जास्त पाच पॅक खरेदी करता येत आहेत. त्यामुळे एका ऑर्डरमध्ये जास्तीत जास्त 5 किलो साखर खरेदी करता येत आहे. पुण्यातील D-Martच्या एका स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी लावण्यात आलेल्या सूचनेनुसार, एका इनव्हॉइसवर जास्तीत जास्त 5 किलो साखर खरेदी करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे साखरेची विक्री बंद करण्यात आलेली नसली तरी एका ग्राहकाला एकाच वेळी किती साखर खरेदी करता येईल, यावर मर्यादा आणण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही काळात साखरेच्या किरकोळ दरातही मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी साखरेचा किरकोळ दर प्रतिकिलो सुमारे 41 रुपये होता. त्यानंतर दर वाढत 65 रुपयांपर्यंत पोहोचला.मात्र, सणासुदीच्या काळात साखरेची मागणी आणखी वाढल्यास दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेचा पुरवठा आणि उपलब्धतेवर दबाव कायम राहिल्यास ग्राहकांच्या खरेदीवर लावण्यात आलेले निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. दरवाढीचे कारण काय? साखरेच्या दरवाढीमागे यंदाचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, देशाबाहेर झालेली साखर निर्यात आणि बाजारातील उपलब्ध साठ्यावर आलेला दबाव ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. काही उद्योग संघटनांकडून उत्पादनाचे अंदाजही अपेक्षेपेक्षा वेगळे ठरल्याने बाजारातील गणित बिघडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही मध्यस्थांकडून साठेबाजी होत असल्याच्या चर्चाही बाजारात आहेत. मात्र, साठेबाजीच्या आरोपांबाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही.
खाद्यपदार्थही महागण्याची शक्यता ? साखरेच्या वाढत्या किमतीचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांवर होणार नाही, तर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. बिस्किटे, मिठाई, बेकरी उत्पादने, स्नॅक्स आणि इतर पॅकेज्ड फूडच्या उत्पादनात साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातच खाद्यतेलाच्या किमतीही वाढत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे काही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत 5 ते 6 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला फटका रक्षाबंधनासह आगामी सणांच्या काळात मिठाई, बेकरी उत्पादने आणि घरगुती पदार्थांची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत साखरेचा पुरवठा मर्यादित राहिला आणि दर पुन्हा वाढले, तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होऊ शकतो. सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला असला तरी बाजारातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेचे दर आणि उपलब्धता याकडे ग्राहकांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष लागले आहे.
हेही वाचा.. ‘लव्हस्टोरी’मुळे MPSCचा पेपर फुटला!:प्रियकराने आयोगातील कर्मचाऱ्याशी हातमिळवणी केल्याचा संशय, एकाला पेपर मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर आली आहे. एका प्रियकराने एमपीएससीमधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फुटलेला प्रश्नसंच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसून एका उमेदवाराला त्याचा थेट फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.सविस्तर वाचा..
Source link
साखरेच्या खरेदीवर डी-मार्ट, बिगबास्केट, ब्लिंकिटवर मर्यादा:5 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही; कंपन्यांचा मोठा निर्णय ?