महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर आली आहे. एका प्रियकराने एमपीएससी
.
मात्र, एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका आधी मिळाल्याचा संशय असतानाही आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप असून, परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता आणि प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
22 मार्चला झाली होती ऑफलाइन परीक्षा
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा घेतली होती. ही परीक्षा राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर झाला. चाळणी परीक्षेनंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीत घेण्यात आल्या.
22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या 485 आणि अपात्र ठरलेल्या तीन अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली होती. मात्र, त्याचदरम्यान परीक्षेतील प्रश्नपत्रिका आधीच एका उमेदवाराला मिळाल्याचा आरोप समोर आला आणि संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आले?
या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. आयोगाच्या माहितीनुसार, तपासात एका उमेदवाराला परीक्षेचा प्रश्नसंच आधी मिळाल्याचे आणि त्या प्रश्नसंचाचा त्याने लाभ घेतल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. याच तपासाच्या पार्श्वभूमीवर आता पेपरफुटीमागे प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर येत आहे. एका प्रियकराने एमपीएससीमधील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हा प्रश्नसंच संबंधित उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. मात्र, प्रेमसंबंध, संबंधित कर्मचारी आणि प्रश्नपत्रिका नेमकी कशी बाहेर आली, याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे संपूर्ण तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ‘लव्हस्टोरी’तील नेमके तथ्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
एका उमेदवारासाठी शेकडो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा
या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर प्रश्नसंचाचा थेट लाभ एका उमेदवारालाच झाला असेल, तर संपूर्ण परीक्षा रद्द का करण्यात आली? एमपीएससीच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि परीक्षेची निष्पक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी अनधिकृत व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे एका उमेदवाराला लाभ झाला असला तरी सर्व उमेदवारांना समान संधी मिळाली होती का, याबाबत शंका निर्माण झाल्याने आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका मात्र अशा विद्यार्थ्यांना बसणार आहे, ज्यांनी कोणताही गैरप्रकार न करता प्रामाणिकपणे परीक्षा दिली, मुलाखती पूर्ण केल्या आणि अंतिम यादीची प्रतीक्षा केली.
फेरपरीक्षा होणार; विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
एमपीएससीने औषध निरीक्षक, गट-ब पदाची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष फेरपरीक्षेच्या तारखेकडे लागले आहे. आधीच अनेक महिने तयारी करून परीक्षा, निकाल आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुन्हा त्याच प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
20 मार्चलाच प्रश्न मिळाल्याचा रोहित पवारांचा दावा
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच पेपरफुटीचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणासंदर्भात सादरीकरण करत नंदुरबारमधील एका खासगी अकादमीतील विद्यार्थ्याला परीक्षेच्या जवळपास 90 टक्के प्रश्न आधीच मिळाल्याचा दावा केला होता. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, 22 मार्चला परीक्षा होणार असताना संबंधित प्रश्न २० मार्चलाच उपलब्ध झाले होते. पैसे मिळाल्यानंतर प्रश्न व्हॉट्सॲपवर पाठवले जात आणि काही मिनिटांनी ते संदेश ‘डिलीट फॉर ऑल’ केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संबंधित प्रश्न डाउनलोड करून एका व्यक्तीने आपल्या मित्राला पाठवल्याचा दावाही पवार यांनी केला होता. या व्यवहाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यावेळी एमपीएससीने पेपरफुटीचे आरोप मान्य केले नव्हते. आता गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक तपासानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
पेपर फुटला नसेल तर भरती प्रक्रिया रद्द का केली?
आयोगाने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार यांनी एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी आरोप फेटाळले जात होते; मात्र आता भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी अनेक महिने, काही वेळा अनेक वर्षे तयारी करून परीक्षा द्यायची आणि एखाद्या व्यक्तीच्या गैरप्रकारामुळे संपूर्ण परीक्षा रद्द व्हावी, ही परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
परीक्षा प्रक्रियेवर पुन्हा विश्वास कसा निर्माण होणार?
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेचे प्रकरण केवळ एका भरतीपुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हा विश्वासाचा प्रश्न बनला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मोठा खर्च करून राहतात. वर्ग, पुस्तके, अभ्यास साहित्य, निवास आणि रोजच्या खर्चाचा भार सहन करत ते अनेक महिने अभ्यास करतात. अशा परिस्थितीत परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटी किंवा गैरप्रकारामुळे प्रक्रिया रद्द झाली, तर त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाया जाते.
या प्रकरणात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असला तरी प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, संबंधित कर्मचारी कोण होता, प्रश्नसंच कोणाला मिळाला, त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी होणे आता महत्त्वाचे आहे. सध्या तपासाचा प्राथमिक निष्कर्ष एका उमेदवाराला प्रश्नसंचाचा लाभ झाल्याभोवती केंद्रित असला, तरी कथित ‘प्रेमप्रकरणा’चा नेमका संबंध काय आणि प्रश्नपत्रिका आयोगाच्या गोपनीय यंत्रणेतून बाहेर कशी आली, याचे उत्तर तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एका कथित प्रेमसंबंधामुळे शेकडो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न सध्या राज्यातील स्पर्धा परीक्षा विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा…
पेपरफुटीवरून आमदार रोहित पवार यांचा आक्रमक इशारा: MPSC अध्यक्ष हे मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, नाहीतर 1 सप्टेंबरला तीव्र आंदोलन

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प्रश्नसंचाचा आधीच लाभ मिळाल्याचे निष्पन्न झाल्याने आयोगाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी