![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण परिसरातील विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने तयार केलेल्या कृती आराखड्याचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणे आणि सुरक्षेचे प्रश्न मार्गी लावण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित करणे, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. चाकणच्या औद्योगिक विस्ताराला आणि वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून १०० अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा कृती आराखडा सादर केला. या कामांचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेतली जाईल. अतिक्रमणे हटविण्याची कारवाई शुक्रवारपासून सुरू करून ती महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्याबरोबरच, औद्योगिक कंपन्यांच्या पाळ्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. प्लास्टिक कचऱ्यावरही तातडीने उपाययोजना केली जाईल. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणे हटवून आवश्यक ठिकाणी रस्ते रुंदीकरण केले जाईल, असे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. विविध विभागांनी समन्वयाने काम केल्यास चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Source link
सुनेत्रा पवार यांनी चाकण विकास आराखड्याचा घेतला आढावा:सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश