महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केले
.
या कारवाईमुळे एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकाराचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पेपर नेमका कुठून फुटला, तो कोणाच्या माध्यमातून बाहेर गेला, त्याचा लाभ कोणाला मिळाला आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
दरम्यान, पेपरफुटीच्या तक्रारी आणि तपासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने औषध निरीक्षक, गट-ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
3 एमपीएससी अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
औषध निरीक्षक परीक्षेतील प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याच्या प्रकरणात एमपीएससीमधीलच काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये क्लासचालक आणि संबंधित परीक्षार्थ्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सहा आरोपींना अटक झाल्यानंतर आता त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
या चौकशीतून पेपरफुटीची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेत कोणकोणत्या व्यक्तींना प्रवेश होता, त्यापैकी कोणाकडून प्रश्नपत्रिका बाहेर गेली आणि ती पुढे कशी पोहोचवण्यात आली, याचा तपास केला जात आहे.
‘प्रेमप्रकरणा’तून पेपरफुटीचा धक्कादायक दावा
या प्रकरणाच्या तपासात एका कथित प्रेमप्रकरणाचा धागा समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका उमेदवाराला परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तिच्याशी संबंधित व्यक्तीने एमपीएससीतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्याचा संशय आहे. याच माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात आल्याचा प्राथमिक तपासातील दावा आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या तपासानुसार फुटलेला प्रश्नसंच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये वितरित झाल्याचे स्पष्ट झालेले नसून तो एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय असला तरी संपूर्ण परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आयोगाने परीक्षा रद्द केली. त्यामुळे पेपरफुटीचा गैरफायदा न घेतलेल्या शेकडो उमेदवारांनाही त्याचा फटका बसला आहे. या कथित प्रेमप्रकरणाची नेमकी भूमिका काय होती, संबंधित व्यक्तींमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता का आणि पेपर मिळवण्यासाठी कोणाला किती पैसे देण्यात आले, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
22 मार्चला झाली होती परीक्षा
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीने 29 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी एकूण 506 उमेदवार पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 485 उमेदवार पात्र आणि तीन उमेदवार अपात्र ठरले होते. मात्र, त्यानंतर परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आधी आरोप फेटाळले, नंतर परीक्षा रद्द
पेपरफुटीचा आरोप समोर आल्यानंतर सुरुवातीला एमपीएससीकडून हा आरोप मान्य करण्यात आला नव्हता. मात्र, काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान एका उमेदवाराला प्रश्नसंच आधी मिळाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले. अखेर एमपीएससीने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयोगाच्या निर्णयामुळे आता या पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे.
फेरपरीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
एमपीएससीने फेरपरीक्षेबाबत उमेदवारांना दिलासा दिला आहे. आधीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आधीच्या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना आता आयोगाच्या पुढील सूचनेकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.
रोहित पवारांनी आधीच केला होता पेपरफुटीचा आरोप
या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच पेपरफुटीचा आरोप करत आवाज उठवला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत प्रश्नपत्रिका आधीच एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा दावा केला होता. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, 22 मार्चला परीक्षा असताना त्याआधीच काही प्रश्न उमेदवाराला मिळाले होते. संबंधित प्रश्न व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवले जात असल्याचा आणि नंतर ते संदेश हटवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांसोबत काही पुरावे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि पोलिस तपासामुळे प्रकरणाला वेग आला. आता एमपीएससीने परीक्षा रद्द केल्याने या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे आयोगाने अधिकृतपणे मान्य केले आहे. मात्र, पेपरफुटीमागील संपूर्ण यंत्रणा आणि प्रत्येक आरोपीची भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
आणखी कोणाचा सहभाग? पोलिस तपास सुरू
सहा जणांना अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या तपासाला आता महत्त्वाची दिशा मिळाली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, त्यांनी प्रश्नपत्रिकेपर्यंत कसा प्रवेश मिळवला आणि ती बाहेर काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला, याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर क्लासचालक आणि परीक्षार्थ्याच्या नातेवाईकांची भूमिका, त्यांच्यातील संपर्क आणि संभाव्य आर्थिक व्यवहार यांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अटक केलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत असल्याने चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचली असली तरी त्याचा परिणाम शेकडो प्रामाणिक उमेदवारांवर झाला आहे. अनेक महिने अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा त्याच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एमपीएससीच्या गोपनीय परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा…
‘लव्हस्टोरी’मुळे MPSCचा पेपर फुटला!:प्रियकराने आयोगातील कर्मचाऱ्याशी हातमिळवणी केल्याचा संशय, एकाला पेपर मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर आली आहे. एका प्रियकराने एमपीएससीमधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फुटलेला प्रश्नसंच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसून एका उमेदवाराला त्याचा थेट फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
पेपरफुटीवरून आमदार रोहित पवार यांचा आक्रमक इशारा: MPSC अध्यक्ष हे मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, नाहीतर 1 सप्टेंबरला तीव्र आंदोलन

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प्रश्नसंचाचा आधीच लाभ मिळाल्याचे निष्पन्न झाल्याने आयोगाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी