![]()
पुण्यात मतदार यादीत दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोथरूडमधील रामबाग कॉलनी येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, ‘मतदार नोंदणी यादीत ज्येष्ठ नागरिकाच्या वडिलांच्या नावात चूक झाली आहे. हे नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाईल,’ असे सांगितले. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाचे आधारकार्ड आणि डेबिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना ऑनलाइन पद्धतीने पाच रुपये पाठवण्यास सांगितले. यानंतर चोरट्याने फिर्यादीच्या पत्नीच्या बँक खात्यातून ११ लाख ९७ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, अशाच एका दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरांची १३ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वानवडी परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या ७८ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, ‘एका खासगी बँकेतून बोलत असून, बँक खाते अद्ययावत करायचे आहे,’ असे सांगितले. यानंतर चोरट्यांनी डॉक्टरांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने १३ लाख ६१ हजार रुपये दुसऱ्या खात्यात जमा केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने ज्येष्ठाची 12 लाखांची फसवणूक:कोथरूड पोलिसांकडून सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल