Headlines

परीक्षांमधील गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत:नेहा बोरा यांची शिक्षण व्यवस्था अधिक जबाबदार करण्याची मागणी




सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांनी स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवस्थापनावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यूपीएससीसह विविध लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याची मागणी बोरा यांनी केली आहे. पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून, देशभरातून हजारो विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहतात. त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी हे महत्त्वाचे माध्यम असते, असे बोरा यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत परीक्षांमधील गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होतो. “विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात आणि परीक्षेतील गैरव्यवस्थापन त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरते. ही केवळ प्रश्नपत्रिकेची लढाई नाही, तर विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होऊ नयेत आणि शिक्षण व्यवस्था सुधारावी यासाठीची लढाई आहे,” असे नेहा बोरा म्हणाल्या. शिक्षणाचा अधिकार आणि संधी सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी केलेल्या संघर्षाची बोरा यांनी आठवण करून दिली. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा शेख यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या संघर्षामुळेच आज महिला, दलित आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना विद्यापीठांची दारे खुली आहेत, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील भिडे वाड्याच्या इतिहासाचा संदर्भ देत, महिला आणि वंचित घटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याच्या सामाजिक व्यवस्थेवर त्यांनी भाष्य केले. शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी खुल्या ठेवणे ही सामाजिक न्यायाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्द्यावरही बोरा यांनी आपली भूमिका मांडली. आरक्षणामुळे समाजातील काही घटक धोक्यात असल्याचा प्रचार केला जात असला तरी, देशाच्या सामाजिक इतिहासाकडे पाहणे आवश्यक आहे. महिला, दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी झालेल्या संघर्षाची जाणीव ठेवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सुरक्षिततेचा आणि राजकीय उत्तरदायित्वाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. महिलांवरील अन्यायाच्या घटनांचा संदर्भ देत, सार्वजनिक जीवनात महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेबाबत अधिक जबाबदारीची आवश्यकता असल्याचे बोरा यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *