![]()
पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी शेवगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. सुरुवातीच्या पावसाने उभारी घेतलेली खरिपाची पिके आता पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे करपू लागली आहेत. कापूस, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांना पाण्याचा ताण जाणवत असून अनेक ठिकाणी पिकांची पाने कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटात सापडला असून बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाची पेरणी झाली आहे. ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या उत्पादनासाठी तालुक्याची स्वतंत्र ओळख आहे. सुरुवातीच्या पावसानंतर कापसासह अन्य पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिक वाढविले. आता पीक वाचविण्याची धडपड सुरू आहे. महागडी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज अथवा उसनवारी करून शेतीत पैसा गुंतविला. मात्र, पावसाअभावी पीक हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. पावसाचा परिणाम पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्यावरही होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावत आहे. सध्या १८ गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात पाऊस झाला नाही तर टँकरच्या संख्येत वाढ करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नाथसागरच्या पाण्याने नदीकाठच्या १५ ते २० गावांना दिलासा मिळाला असून नाशिक परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पैठण येथील नाथसागर जलाशय जवळपास ९५ टक्के भरला आहे. उजव्या कालव्यातून पाणी सोडून देण्यात आले आहे. या पाण्यामुळे तालुक्यातील सुमारे १५ ते २० गावांना दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर खरिपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत आहेत. मात्र, पिकांना आवश्यक असलेला पाऊसच नसल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दमदार परतीचा पाऊस वेळेत झाला तरच करपू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळू शकते.
Source link