Headlines

7 कोटी खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यांना गेट का बसवले नाही?:लोकप्रतिनिधींच्या सवालाने अधिकारी निरुत्तर; दिशा समितीच्या बैठकीत अपूर्ण कामांवरून झाडाझडती




जलसंपदा विभागाकडून सात कोटी रुपये खर्चुन बंधारे बांधले मात्र त्यावर गेट न बसवताच कामे पूर्ण झाल्याचे कसे दाखविले, वाहून गेलेल्या पाण्यासाठी कोण जबाबदार असा सवाल लोकप्रतिधिंनी उपस्थित करताच अधिकारी निरुत्तर झाले. या कामांची चौकशी करण्याचे निर्देश गुरुवारी ता. २७ झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष खासदार नागेश पाटील आष्टीकर, सह अध्यक्ष खासदार रामराव वडकुते, आमदार राजेश नवघरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी जलसंपदा विभागाकडून लाख, नवखा, हिवरा जाटू येथे दोन, येडूद, मेथा, शेवाळा येथे एकूण सात बंधारे मागील चार वर्षापुर्वी पूर्ण झाले. याकामांवर ७.९० कोटींचा खर्च झाला असून निधी अभावी कंत्राटदाराने लोखंडी गेट हस्तांतरीत केले नसल्याचे सांगण्यात आले. बंधाऱ्याला गेटच बसविले नाही तर पाणीसाठा वाहून गेला नाही काय, बंधारा बांधून काय उपयोग झाला, निधी संपूर्ण खर्च झाल्यानंतरही गेटचे काम अपूर्ण कसे असा सवाल खासदारांनी उपस्थित केला. यावर अधिकारी निरुत्तर झाले. या कामाची चौकशीचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात वीज कंपनीकडून ८१ ठिकाणी गावठाण फिडर वेगळे करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र ३० ठिकाणीच काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम मागील दोन वर्षापासून रखडल्याचे लक्षात येताच विज कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. कंत्राटदारांकडून तातडीने काम पूर्ण करून घ्या अन्यथा काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत जीवन प्राधिकरण विभागाकडून गोरेगाव, कुरुंदा, डोंगरकडा, बळसोंड, डोंगरकडा येथील कामे अपूर्ण का आहेत. या सर्व कामांचे लेखा परिक्षण करून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून किती ठिकाणी निधीची आवश्‍यता आहे याचा अहवाल देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून नाराजी दिशा समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती असतानाही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे वसमत येथे बैठक असल्याचे सांगून निघून गेले. या प्रकारामुळे लोकप्रतिधिंनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *