![]()
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मेहकर शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्साह आणि धार्मिक भावना व्यक्त केली. जुलूसच्या मार्गावर करण्यात आलेली आकर्षक सजावट, हिरवे झेंडे, धार्मिक संदेश आणि विद्युत रोषणाई मुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सदर उत्सव २६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणुकीतील प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी यावेळी शहरातून जुलूस काढण्यात आला. हा जुलूस शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाला. याची सुरुवात इमामवाडा चौकातून करण्यात आली. त्यानंतर सदर जुलूस मस्तान चौक मार्ग, अंजाना चौक, मोती मस्जिद चौक, गवळीपुरा, माळीपेठ येथील मरिमाता चौक, जुनी जिजामाता शाळा त्रिवेणी मार्गे जामा मस्जिद पर्यत जुलूस काढण्यात आला. जामा मस्जिद येथे फातेहाखानी झाल्यानंतर जुलूसचा शांततेत समारोप करण्यात आला. यावेळी जुलूसमध्ये मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या सह नगरसेवक महेबूब भाई गवळी, नगरसेवक इब्बू चौधरी, माजी नगरसेवक हबीब बागवान, तौफिक कुरेशी, अलियार खान पठाण, सलमान कुरेशी, सिकंदर भाई, शेख लाल भाई, रफीक कुरेशी, हुसेन गवळी, इब्राहिम रेघीवाले, नवाज गवळी, ख्वाजा गवळी, महेब, सद्दाम नानगीवाले, फिरोज खान ठेकेदार, अफरोज खान पठाण, फिरोज आतार, मदन चौधरी, फिरोज लाईनमन, एजाज भाई, मोजीम शहा, कौसर कुरेशी, फारुख भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलिस अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा जुलूस दरम्यान मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी माजी नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी कासम भाई गवळी यांच्यासह उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. जुलूस शांततेत पार पडावा यासाठी मेहकर पोलिसांकडून संपूर्ण मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे तसेच वाहतूक मार्गांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आयोजक आणि समाजबांधवांनीही शिस्त राखत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी मुस्लिम समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत मेहकर शहरातील सामाजिक एकोपा, शांतता आणि बंधुभावाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. सर्व धर्मीयांनी एकमेकांच्या सण-उत्सवांचा आदर करून सामाजिक सलोखा अधिक दृढ करावा, असा संदेश त्यांनी दिला.
Source link
मेहकरमध्ये जुलूस उत्साहात; सामाजिक सलोख्याचा संदेश:धार्मिक घोषणांनी दुमदुमले शहर; शांततेत झाला समारोप