![]()
तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे सिद्धाराम बाके तर उपसभापती म्हणून निंगाप्पा पुजारी यांची १३ विरुद्ध ५ मतांनी निवड झाली. शिवसेना शिंदे गटाचे शिवानंद पाटील व उपसभापती पदासाठीचे उमेदवार इराणा धसाडे यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांनी काम पाहिले.या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी भाजपचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, दुधनी बाजार समितीचे संचालक देवेंद्र बिराजदार, सातलिंगप्पा परमशेट्टी, मल्लिकार्जुन झळके,विश्वनाथ नागुर, मोतीराम राठोड, सुवर्णा मचाले, अश्विनी सालेगाव, रमेश पाटील आदी उपस्थित होते.२०२३ मध्ये झालेल्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजार समितीवर सत्ता काबीज केली. सभापती अप्पू परमशेट्टी व उपसभापती सिद्धाराम बाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती. प्रशासनाने नव्याने रिक्त पदांची निवडणूक घेतली. प्रतिनिधी | कुर्डूवाडी रेल्वे अपघात अथवा कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी विविध यंत्रणा किती तत्परतेने कार्यरत होतात, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कुर्डूवाडी येथे रेल्वे प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त सहभागातून थरारक आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल घेण्यात आले. रेल्वे वर्कशॉपजवळील शंटिंग लाईनवर झालेल्या या प्रात्यक्षिकात अपघातग्रस्त प्रवाशांची सुटका, वैद्यकीय मदत, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय समन्वयाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नियोजनानुसार कुर्डूवाडी स्थानकाजवळील गेट क्रमांक ३८ परिसरात शंटिंगचे काम सुरू असताना दोन डबे रुळावरून घसरल्याचे आभासी दृश्य निर्माण करण्यात आले. या दुर्घटनेत १३३ प्रवासी डब्यांमध्ये अडकले, तर त्यापैकी तीन जणांचा मृत्यू आणि २३ जण जखमी झाल्याचे दाखवण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे गृहीत धरून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आपत्कालीन सायरन वाजताच रेल्वेच्या विविध विभागांसह सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफच्या ३५ जवानांनी अत्याधुनिक कटिंग उपकरणांसह अपघातग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी मोहीम हाती घेतली. रेल्वेचे वैद्यकीय, सिव्हिल डिफेन्स आणि यांत्रिक विभागातील सुमारे ११० कर्मचारीही बचावकार्यात सहभागी झाले. अपघातस्थळी आरपीएफ, रेल्वे पोलिस, पॅरामेडिकल पथक आणि डॉग स्क्वॉडने परिसराचा ताबा घेतला. बचावकार्य सुरू असतानाच प्रवाशांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी १० ते १२ टीटीई आणि पाच कुलींच्या मदतीने हेल्प डेस्क सुरू करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना आर्थिक मदत मिळावी यासाठी वाणिज्य विभागाकडून सानुग्रह अनुदानाच्या स्वरूपात रोख रकमेचीही व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोलापूर कंट्रोल रूममधून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले. घटनेनंतर अवघ्या १० मिनिटांच्या आत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महसूल विभागाला माहिती देण्यात आली, अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने अपघातग्रस्त डब्यांचे कटिंग करून त्यामध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर ही घटना केवळ मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले.
Source link
कुर्डुवाडीमध्ये एनडीआरएफचे थरारक मॉकड्रिल:रेल्वेच्या आपत्कालीन तत्परतेची घेतली चाचणी