![]()
स्नेहालय संचालित युवा निर्माण प्रकल्पाच्या वतीने आयोजित ३५वे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान झालेल्या या तीन दिवसीय शिबिरात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील १६० हून अधिक युवक सहभागी झाले. ‘सामाजिक जाणिवेतून बदलाच्या कृतीकडे, युवा जागृतीतून राष्ट्रनिर्माणाकडे’ या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिबिरात सामाजिक प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव, संवाद, श्रमदान, प्रकल्पभेटी आणि स्वयंसेवकांच्या प्रेरणादायी जीवनकथांचा समावेश होता. ऊसतोड कामगार, शेतकरी, महिला, बालविवाह, अनाथ मुले आदी प्रश्नांवर भूमिकानाट्याच्या माध्यमातून युवकांना संवेदनशील करण्यात आले. डॉ. विक्रम पानसंबळ यांनी एचआयव्ही/ एडस् विषयावर शास्त्रीय माहिती दिली. संतोष धर्माधिकारी यांच्या टीमने पोस्को कायद्याबाबत मार्गदर्शन केले. स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी ऑनलाइन संवादातून सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन केले. शिबिरार्थींना स्नेहालयच्या स्नेहांकुर, स्नेहस्पर्श, मानसग्राम आदी प्रकल्पांना भेटी देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेता आली. युवा निर्माणचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विनय कोपरकर, संचालक अनिल गावडे, ॲड. शाम असावा यांनी युवकांच्या सामाजिक भूमिकेवर मार्गदर्शन केले. विविध स्वयंसेवकांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून युवकांना प्रेरणा दिली. सामाजिक प्रश्न केवळ ऐकायचे नाहीत, तर ते समजून घेऊन त्यावर कृती करायची, हा संदेश युवकांनी घेतला. शिबिर संपले असले तरी सामाजिक जाणीवेचा प्रवास आता सुरू झाला आहे, अशी भावना समारोपावेळी व्यक्त झाली.
Source link
जागृती:संवाद, विचारांची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी; शिबिरातून युवकांना मिळाली समाजकार्याची दिशा