Headlines

पुण्यातील सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’ कारवाई:आंदेकर टोळीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नाप्रकरणी कठोर पाऊल




नाना पेठेतील बंडू आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्याच्या तयारीत ही टोळी होती, असे उघडकीस आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मकोका कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ रा. नाझरे, भोर), धीरज लखारा (रा. धनकवडी) आणि मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी) यांचा समावेश आहे. यापैकी वेदांत, अथर्व आणि धीरज यांना अटक करण्यात आली आहे, तर सूरज ठोंबरे आणि मानव ढमाले फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नाना पेठेतील वर्चस्वाच्या वादातून दोन वर्षांपूर्वी बंडू आंदेकर यांचा मुलगा नगरसेवक वनराज आंदेकर याचा सोमनाथ गायकवाड टोळीने खून केला होता. सूरज ठोंबरे हा गायकवाडचा जवळचा साथीदार आहे. गायकवाड सध्या कारागृहात असून, त्याच्या टोळीची सूत्रे ठोंबरे सांभाळत होता. कृष्णा आंदेकरला न्यायालयातून नेत असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा कट ठोंबरेने रचला होता. या माहितीनंतर पोलिसांनी ठोंबरेच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ठोंबरेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकावणे, पिस्तूल बाळगणे आणि दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठोंबरे टोळीविरुद्ध मकोका कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, विश्रांतवाडी आणि येरवडा भागात दहशत माजवणारा गुंड शोएब कुरेशी याच्याविरुद्धही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मकोका कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी शोएब रशीद कुरेशी (वय २६), हुसेन अस्लम खान (वय २१, दोघे रा. चंद्रमानगर, येरवडा) आणि राज मुकेश सरवदे (वय २१, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. कुरेशीसोबत गुन्हे करणाऱ्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर हल्ला केला होता. या गुन्ह्यात कुरेशी आणि साथीदारांविरुद्ध कलमवाढ करण्यात आली होती. त्यानंतर मकोका कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला, ज्याला नुकतीच मंजुरी मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *