![]()
गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचे चांगले गणवेश कापून नमुने घेतल्याचा गंभीर आरोप राहुरी तालुक्यात समोर आला आहे. उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या अंगावरील गणवेशातूनच कापडाचे नमुने घेतल्याचे सांगितले जात असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील नऊ केंद्रांमधील शाळांमध्ये हा प्रकार घडल्याची चर्चा असून पालक व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गणवेश पुरवठादाराने यापूर्वीच कापडाचे नमुने तपासणीसाठी दिले असताना पुन्हा तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शर्ट, पॅन्ट, फ्रॉक आणि सलवारमधून तीन बाय तीन सेंटीमीटरचे कापड कापण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे. काही शाळांमध्ये गैरहजर विद्यार्थ्यांचे शिल्लक गणवेशही कापून नमुने घेतल्याचे सांगण्यात येते. गणवेश खराब झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा गणवेश द्यावा लागणार असल्याने त्याचा आर्थिक भार कोण उचलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नुकसान झाले असल्यास भरपाई द्यावी आणि अंगावरील कपडे कापण्याचे आदेश कोणी दिले, याची चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. गणवेश खरेदी व तपासणीच्या प्रक्रियेबाबतही काही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ^ पुरवठादाराने दिलेला गणवेशाचा नमुना प्रयोगशाळेसाठी आवश्यक आकारापेक्षा कमी असल्याने शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या गणवेशाचे नमुने घेतले जात आहेत. शाळेजवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश बदलून येण्यास सांगून नमुने घेण्यात येत आहेत. जिल्हाभर ही प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. जयश्री कार्ले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, राहुरी तीन बाय तीन सेंटीमीटरच्या तुकड्यासाठी गणवेश कापला? केंद्रप्रमुखांनी मुलांचा आणि मुलींचा प्रत्येकी एक गणवेश कापून तीन बाय तीन सेंटीमीटरचा कापडाचा नमुना घेतल्याचे पालकांचे म्हणणे आहे. एवढ्या छोट्या नमुन्यासाठी संपूर्ण गणवेश खराब केल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. गणवेशाचा खर्च शिक्षकांच्या माथी? गणवेश खरेदीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असताना कापड तपासणीची जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात असल्याची भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली. खराब झालेल्या गणवेशांऐवजी नवीन गणवेश देण्याचा आर्थिक भार कोण उचलणार, हा प्रश्न कायम आहे. शासन निर्देशानुसारच नमुने घेतले
Source link
गणवेश तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे चक्क कपडेच कापले!:नुकसान भरपाईची मागणी राहुरीतील 9 केंद्रांतील शाळांत प्रकार; पालक-शिक्षकांत संताप