Headlines

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ अरविंद खळदकर यांचे निधन:जनता बँकेचे माजी अध्यक्ष, डेक्कन सोसायटीचेही प्रमुख होते




ज्येष्ठ बँकिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ तसेच जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अरविंद केशव खळदकर (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणूनही ते परिचित होते. शनिवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँकिंग, सहकार, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. खळदकर हे १९९७ पासून जनता सहकारी बँकेचे संचालक होते आणि २००१ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात जनता सहकारी बँक आर्थिक अडचणीतून बाहेर पडली, ज्याचे रिझर्व्ह बँकेनेही विशेष कौतुक केले होते. या अनुभवावर आधारित त्यांचे ‘नवल वर्तले’ हे पुस्तक विशेष गाजले. मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक बँकिंग क्षेत्रात अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली जनता बँकेला बहुराज्यीय बँकेचा दर्जा मिळाला. त्यांनी १९९४ मध्ये आयकर खात्यातून उपायुक्त पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर अखेरपर्यंत कर सल्लागार म्हणून काम केले. ‘शेअर बाजाराशी मैत्री’, ‘जोडोनिया धन शेअर्स व्यवहारे’ आणि ‘गुंतवणुकीचे शास्त्र’ ही त्यांची इतर पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. शेअर मार्केट, गुंतवणूक, बँकिंग आणि सहकार या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आणि विविध नियतकालिकांमधून विपुल लेखनही केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी विश्वस्त, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त आणि सहकार भारती नागरी बँक विभागाचे मार्गदर्शक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. विविध विषयांचा व्यासंग असलेले खळदकर हे तल्लख बुद्धिमत्तेचे कुशल प्रशासक होते. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते, तसेच संतसाहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *