Headlines

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा अखेर रद्द!:तांत्रिक अडचणींवरून विद्यार्थी होते आक्रमक; नवी तारीख लवकरच




मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात लिपिक पदासाठी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अनेक ठिकाणी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला होता. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे ठिय्या आंदोलन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रश्नावर प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने 16 ऑगस्ट रोजी झालेली ही ऑनलाइन टंकलेखन चाचणी अधिकृतरीत्या रद्द केली आहे. या परीक्षेची नवी तारीख आणि सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती उच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तांत्रिक अडचणींचा फटका बसलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आता परीक्षेची पुन्हा नव्याने संधी मिळणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्द मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (क्लार्क) पदासाठी 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन चाचणी अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे आणि की-बोर्ड व्यवस्थित न चालणे यांसारख्या गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागला होता. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, वाशिम आणि हिंगोलीसह विविध परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी या गोंधळाबाबत तक्रारी करत समस्या मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या अडचणींची दखल घेत न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली असून, परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रोहित पवार काय म्हणाले? उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे साहेब आणि महाधिवक्ता मिलिंद साठे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडं संबंधित परीक्षेची टायपिंग टेस्ट रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली टायपिंग टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबद्दल माननीय न्यायालयीन प्रशासनाचे आभार. झालेल्या परीक्षेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नव्याने घेण्यात येणारी टायपिंग टेस्ट स्वतंत्र व पारदर्शक पद्धतीने घेतली जावी, अशी विनंती देखील पवार यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *