![]()
‘आमदार मुक्कामी, आपल्या गावी’ या अभिनव अभियानांतर्गत माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी देवडे (ता. पंढरपूर) येथे मुक्काम करून गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. गावातील अडीअडचणी जाणून घेतानाच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवून अनेक प्रलंबित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच दारात आल्याने या उपक्रमाला देवडे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवडेतील बैठकीला तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून अनेक प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात आले. उर्वरित प्रश्नांवर संबंधित विभागांना वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अनेक नागरिकांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे जागेवरच वाटप करण्यात आले. संवादादरम्यान देवडे येथील ग्रामस्थांनी शेतजमिनींचे बांध, रस्ते, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, रेशन धान्य, शाळा, घरकुल, आरोग्य सुविधा व विविध दाखल्यांसंबंधीच्या अडचणी मांडल्या. आमदारांनी प्रत्येक प्रश्नाची नोंद घेत अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. गावकऱ्यांसोबत पंगतीला भोजन आणि रात्री हितगुज या अभियानाचा हा दुसरा टप्पा असून, आमदार पाटील यांनी केवळ बैठकीपुरता कार्यक्रम न ठेवता गावकऱ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला आणि रात्री उशिरापर्यंत मनमोकळा संवाद साधला. हे अभियान केवळ देवडे गावापुरते मर्यादित न ठेवता माढा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुक्काम करून प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Source link
प्रशासन गावाच्या दारी:देवडेमधील मुक्कामात अभिजित पाटलांचा वीज, रस्ते, पाणी प्रश्नांवर शेतकऱ्यांशी संवाद