![]()
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्थापन केलेल्या अशोक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लागू केले आहेत. २८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय बँकेला नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर अथवा नूतनीकरण करता येणार नाही. नवीन गुंतवणूक, निधी उभारणी, नवीन ठेवी स्वीकारणे तसेच काही प्रकारची देणी किंवा दायित्वे स्वीकारण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेच्या सध्याच्या तरलतेची स्थिती लक्षात घेता बचत, चालू किंवा अन्य खात्यांमधून ठेवीदारांना रक्कम काढता येणार नाही. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार ठेवींवरील कर्जाची समायोजनाची परवानगी आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे, वीजबिलांसारख्या अत्यावश्यक खर्चांना परवानगी देण्यात आली आहे. बँकेच्या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरणावरही निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बँकेची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून बँकेबाबत अफवा पसरल्याने ठेवीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे करंट, सेव्हिंग आणि पिग्मी खात्यांतील पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि बँकेच्या तरलतेवर परिणाम झाला. काही ठेवीदारांनी रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी केल्यानंतर निर्बंध लागू झाल्याचे त्यांनी सांगितले. मुदत ठेवी मोठ्या प्रमाणात असून त्यांचे प्री-मॅच्युअर पेमेंट सध्या करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले असून जिल्ह्यातील इतर बँकांवरही यापूर्वी अशा प्रकारचे निर्बंध आले होते आणि त्या नंतर सुरळीत झाल्या. अशोक बँकही सहा महिन्यांत पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जवाटप अधिक आणि वसुली कमी झाल्याने बँकेसमोर अडचणी निर्माण झाल्याचे मान्य करत कर्जदार, सभासद आणि ठेवीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुरकुटे यांनी केले. सीए तरी अशोक बँकेत नापास झालो : मुरकुटे ‘मी सीए असलो तरी अशोक बँकेच्या कारभारात नापास झालो,’ अशी स्पष्ट कबुली माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अफवांमुळे बँकेवर परिणाम झाला असून वसुलीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचा परवाना रद्द नाही रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले असले तरी बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे निर्देश लागू केले आहेत. परिस्थितीनुसार रिझर्व्ह बँकेने या निर्देशांमध्ये बदल किंवा अन्य योग्य कारवाई करू शकते. ठेवीदारांनी घाबरून न जाता वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Source link
व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी मर्यादा:"अशोक'वर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, परिस्थिती पूर्वपदावर आणू- मुरकुटे