Headlines

शाळेमध्ये पाऊल ठेवताच सुरू झाला प्रश्नांचा भडीमार:आ. पाचपुते यांचा जि. प. शाळांचा अनपेक्षित भेटींचा दौरा‎




शाळांची परिस्थिती कागदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन जाणून घेण्याचा उपक्रम आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सुरू केला आहे. श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना त्यांनी अचानक भेटी देत शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींची पाहणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नारायण आश्रम येथे भेटीदरम्यान पाचपुते यांनी शिक्षकांशी चर्चा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेत कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या अडचणी भेडसावत आहेत, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच इतर मूलभूत गरजा याबाबत त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेत आवश्यक सुविधांसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ‘शाळेत चला, समस्या समजून घ्या आणि उपाययोजना करा’, या भूमिकेतून हा दौरा करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शाळांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देतानाच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे पाचपुते यांनी सांगितले. मतदारसंघातील शाळांचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वेळी गटशिक्षणाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अहवाल नको, थेट वास्तव पाहणार! शाळांच्या अडचणींचे केवळ कागदोपत्री अहवाल घेण्याऐवजी आमदार पाचपुते यांनी थेट शाळेच्या वर्गात पोहोचून परिस्थिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या गरजा समजून घेण्याच्या या पद्धतीमुळे शाळांच्या प्रश्नांना आता थेट पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *